निवेदनात, तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान वीस टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. ऑगस्ट पंधरवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे नंदुरबार तालुक्यातील कोरडवाहू व बागायतदार शेतकरी धास्तावले असून रब्बीची नगदी पिके घेणा-या शेतकऱ्यांच्या दोन वेळा पेरण्या झाल्या आहेत. तरीही, शासनाने शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिलेली नाही.
तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी उपाययोजना गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे यंदा तरी प्रशासनाने तत्काळ पावले उचलून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. प्रकाशा व सारंगखेडा येथे तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसचे पाणी गेल्या पंधरा वर्षांपासून तसेच साठवून ठेवण्यात आले आहे. हे पाणी शेती सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. युद्धपातळीवर प्रशासनाने कारवाई सुरू करावी. दुष्काळी परिस्थितीची भीषणता लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ हाती घेऊन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व शेतमजूर यांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे.
येत्या आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे योगेश नामदेव पाटील, अमोल किशोर पाटील, अंबर तेजू भिल, श्यामा दामा ठेलारी आदी उपस्थित होते.