शहादा शहर व तालुक्यात कोरोना रूग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यात बाधित रूग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून त्यात अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच समूह संपर्कातून कोरोना बाधितांची संख्या जास्त वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय रूग्णालयाबरोबरच खासगी रूग्णालये ही फुल आहेत. कोरोना बाधित रूग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होणे दुरापास्त झाले असून रूग्णवाहिकांची संख्याही तोकडी पडत आहे. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. बाधित रूग्णांचे नातेवाईक औषध उपयोगी साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे काही नागरिक व विक्रते शासनाचे नियम पायदळी तुडवताना दिसून येत असल्याने अधिक धोका वाढून आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवार ते रविवारपर्यंत चार दिवस जनता कर्फ्यूचे आदेश दिल्यानंतर शहरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. सलग चार दिवस शहर बंद असल्याने अत्यावश्यक साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र होते. बसस्थानक परिसर, स्टेट बँक चौक, मेन रोड, भाजी मार्केट या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक खोळंबली होती. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शहरातील नागरिकांनी शासनाचे नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ राहुल वाघ यांनी केले आहे.