लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधीक नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यावर भर देण्यात येत असून आतापर्यत २० हजार १०४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्यानंतर स्वॅब चाचणीचा वेग वाढविण्यात आला. नंदुरबार तालुक्यात आठ हजार ८६९, शहादा तालुक्यात सहा हजार ३५९, तळोदा एक हजार ६७७, नवापूर तालुक्यात एक हजार ६२०, अक्कलकुवा ८५३, धडगाव तालुक्यात १३० आणि इतर जिल्ह्यातील ५९६ व्यक्तिंची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी पाच हजार ५३४ व्यक्तिंचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. चार हजार ९०० कोरोनाबाधित उपचाराअंती बरे झाले आहेत तर ४९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.कोरोना बाधित व्यक्ती असलेल्या भागात शिबिराच्या माध्यमातून स्वॅब चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. काही ठिकाणी गावातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन स्वॅब चाचणीसाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले. धडगाव येथे संसर्गाचे प्रमाण तर शहादा आणि नंदुरबार येथे जास्त आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गतदेखील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांची स्वॅब चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत लक्षणे आढळलेल्या साधारण ८०० व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यात आली आहे. त्यातील पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तिंवर त्वरीत उपचारदेखील सुरू करण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी खाजगी रुग्णालयात आलेल्या तापांच्या रुग्णांचीदेखील तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. जास्त कोरोनाबाधित असलेल्या गावातील नागरिकांची स्वॅब चाचणी करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत. कोरोना चाचणीसाठी १० फिरत्या पथकांची सुविधादेखील करण्यात आली आहे.
कोरोना चाचण्यांचा २० हजाराचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 13:07 IST