लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर प्रतिबंधक क्षेत्रात समाविष्ट असल्याने शहरात एकाही सार्वजनिक गणेश मंडळाने श्री गणेश मूर्तीची स्थापना केली नाही. परिणामी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही. दरम्यान, घरोघरी मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यात आली असून सकाळपासून सुरू असलेल्या पावसातही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता.११ जुलैच्या शासन निर्णयानुसार कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या क्षेत्राला प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले असल्याने या क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बंधने टाकण्यात आली आहेत. तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४०८ पेक्षा अधिक झाली असून शहादा पोलीस ठाणे हद्दीतील शहादा शहरासह अनेक गावात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहे.शहादा पोलीस ठाणे हद्दीत शहरात ३२ सार्वजनिक गणेश मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जात असे. यंदा संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले असल्याने कुठल्याही सार्वजनिक गणेश मंडळाने श्री गणेशाची स्थापना केलेली नाही. शहरातील अनेक मंडळांना ५० ते १०० वर्ष गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा असतानाही यंदा मात्र कोरोना विषाणूने ही संधी हिरावून नेली आहे. शहादा पोलीस ठाण्यामार्फत प्रतिबंधात्मक क्षेत्रात येणाऱ्या व असणाºया सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देण्यात येणार नाही, असे जाहीर करण्यात आले होते. परिणामी शहरात यंदा रस्त्यावर मंडप नाही, आरास नाही, विद्युत रोषणाई नाही की सायंकाळच्या आरतीसमयी होणारा भोंग्याचा आवाज बंद झाला आहे.सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सव साजरा करण्याची परवानगी नसल्याने शहरातील अनेक मोठे चौक ओस पडले आहेत. शहरातील विविध भागातील चौकात दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळातर्फे मोठमोठे मंडप टाकण्यात येऊन भव्यदिव्य विद्युत रोषणाई केली जात होती. संपूर्ण रस्त्यावर विविध प्रकारची विद्युत रोषणाई केली जात असल्याने या दहा दिवसांच्या उत्सव काळात एक नवीन चैतन्य गणेशभक्तांमध्ये संचारत असे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार नसला तरी शहरात मोठ्या प्रमाणात घरोघरी उत्साहात श्री गणेशाची स्थापना मंगलमय वातावरणात करण्यात आली आहे. लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी बालगोपाल व त्यांच्या पालकांनी सकाळपासूनच शहरात गर्दी केली होती. श्री गणेश प्रतिमेसोबत मखर व इतर आवश्यक साहित्य पूजेसाठी पुष्पहार, दुर्वा खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांमधे कमालीचा उत्साह होता.शहादा पोलीस ठाणे हद्दीतील पुरुषोत्तमनगर, मंदाणे या गावाचा प्रतिबंधात्मक क्षेत्रात समावेश असल्याने तेथे ‘एक गाव एक गणपती’ यंदा नाही तर भोंगरा या गावाचा समावेश प्रतिबंधक क्षेत्रात समावेश नसला तरी यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सहायक निरीक्षक मनोज भदाणे, नीलेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली ७० पोलीस कर्मचारी, ८७ होमगार्ड व एसआरपीचे एक पथक संपूर्ण शहरात विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
शहाद्यात सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा यंदा कोरोनाने केली खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:26 IST