लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे गर्दी होतील असे सार्वजनिक उपक्रम रद्द करण्याचे आदेश शासनाने काढले होते़ यामुळे सर्वच उपक्रम रद्द झाले आहेत़ यात सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांचाही समावेश होता़ याबाबत संस्थांनी शासनाकडे विचारणा केल्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन केल्यास सभा घेण्यास मुभा असल्याचे सांगण्यात आले आहे़मार्च महिन्याचे आॅडिट पूर्ण करण्यात आल्यानंतर बहुतांश सहकारी सहकारी संस्थांच्या कार्यकारिण्या घोषित होण्यास प्रारंभ होतात़ यात प्रामुख्याने सभा घेऊन सर्वानुमते ठराव करण्याची पद्धत आहे़ जिल्ह्यात संस्थांची संख्याही मोठी असल्याने वर्षभर विविध कार्यकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, खादी ग्रामोद्योग, नोकरदारांच्या सहकारी तत्त्वावरील पतपेढ्या यांच्या सभा होवून कार्यकारिणी गठीत करण्याचे काम सुरू असते़ यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होवून लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला होता़ यातून सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांनाही ब्रेक लागला होता़ याबाबत काही संस्थांनी सहकार आयुक्त यांच्याकडे विचारणा केली होती़ यातून सभा घेण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन करत संस्थांनी सभा घेण्याचे सूचित करण्यात आले आहे़ दरम्यान जिल्ह्यातील नोकरदार सहकारी संस्थांकडून वार्षिक लाभांश रखडवला नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ या संस्थांच्या संचालक मंडळाने त्यांच्यातील चर्चेनंतर लाभांश वितरणाचे कामकाज केल्याचे सांगण्यात आले आहे़
जिल्ह्यात एकूण ८१२ सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संस्था आहेत़ यात दोन साखर कारखाने, सूतगिरणी, सहकारी बँक, खरेदी विक्री संघ, नोकरदार पतपेढ्या आदी मोठ्या संस्थांसह ३३५ विविध कार्यकारी संस्थांचा समावेश आहे़ या संस्थांची वार्षिक सभा होणे अपेक्षित असते़ यंदा कोरोनामुळे सभा घ्यावा किंवा नाही अशा संभ्रमात या संस्थांचे संचालक मंडळ होते़ परंतु आता शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करुन सभा घेण्याची परवानगी दिली असल्याने त्यांचे प्रलंबित निर्णय मार्गी लागणार आहेत़
शासनाकडून सहकारी संस्थांना मुदतवाढ देण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत़ ते कधीही वार्षिक सभा घेऊ शकतात़ संचालक मंडळांनी सोशल डिस्टन्सिंग घेऊन या सभांचे कामकाज करणे शासनाला अपेक्षित आहे़ आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसारही सभा झाली पाहिजे़-अशोक चाळक, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, नंदुरबाऱ