६ ते ८ वी चे वर्ग सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:28 AM2020-06-07T11:28:10+5:302020-06-07T11:28:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन जिल्हा ...

Classes 6 to 8 will start | ६ ते ८ वी चे वर्ग सुरू होणार

६ ते ८ वी चे वर्ग सुरू होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने सुरू केले आहे. दिवसातून तीन सत्रात किंवा एक दिवसाआड विद्यार्थ्यांना रोटेशनप्रमाणे शाळेत बोलविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व संबधीत शाळांकडून माहिती मागविण्यात आली आहे. रेड झोन नसलेल्या व गेल्या १५ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळून न आलेल्या ठिकाणीच याबाबतचे नियोजन राहणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळांचे सत्र कधी सुरू होते याकडे आता लक्ष लागले आहे. पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापनांचे शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. शाळा सुरू होवो किंवा नाही, परंतु शैक्षणिक सत्र सुरू करण्याबाबत मात्र शासन ठाम असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेने देखील त्याबाबतचे नियोजन सुरू केले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी आणि पालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी यांना यासंदर्भात पत्र दिले आहे.
कोरोना प्रतिबंधीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त दुर्गम, ग्रामिण व आदिवासी क्षेत्रातील ज्या गावात मागील १५ दिवसात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नसेल तसेच ज्या गावात इंटरनेट मोबाईल कनेक्टिव्हिटी नसेल अशा क्षेत्रात इयत्ता सहावी ते आठवी चे वर्ग असलेल्या शाळांमध्ये शैक्षणिक सत्र सुरु करण्यात येणार आहे. १५ जून पासून सहावी ते आठवी चे वर्ग असलेल्या शाळांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या किंवा ग्रामपंचायत कोरोना प्रतिबंधक समितीच्या बैठका घेवून शाळा केंव्हा सुरू कराव्यात याबाबतचा निर्णय घ्यावा असेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
अशी करून घ्यावी तयारी
शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या मदतीने कोरोना प्रतिबंधासाठी शाळा इमारत व परिसर निर्जंतुकीकरण करावा. शाळेचे मैदान, मुख्याध्यापक दालन, सर्व वर्गखोल्या, स्वच्छतागृह यांची स्वच्छता करावी. शाळेत पिण्यासाठी पुरेसे व स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध होईल याबाबत दक्षता घ्यावी. शाळेत शिक्षक व विद्यार्थ्याचे हात धुण्यासाठी हॅण्डवॉश किंवा साबण तसेच सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनर उपलब्ध करून घेण्यासाठी संबधीत मुख्याध्यापकांनी आवश्यकतेनुसार ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांची मदत घ्यावी. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करावी. शाळेत डिजीटल वगर उपलब्ध असल्यास त्याची व्यवस्थीत जोडणी करून वर्ग वापरण्यायोग्य करावा.
शाळेची पटसंख्या विचारात घेऊन विद्यार्थ्यांमधील योग्य शाररिक अंतर राखण्याच्या दृष्टीकोणातून आवश्यकता असल्यास शाळा दोन किंवा तीन सत्रात जास्तीत जास्त तीन तासांची असावी. शक्य होत नसल्यास विद्यार्थ्यांना एक दिवस सोडून अदलाबदलीने शाळेत बोलवावे. एका वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थी प्रवेशाच्या संदर्भात गूगल लींक सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यावर पावसाळी, वादळी परिस्थिती विचारात घेवून सुरक्षीत ठिकाणी ठेवावे. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना मास्क वापरण्यास बाध्य करावे अशा सुचना देखील देण्यात आल्या आहेत.


प्राथमिक शाळा अर्थात पहिली ते चौथी तसेच शासकीय व खाजगी अंगणवाडी, बालवाडी शाळा सुरू करण्यासंदर्भात काहीही नियोजन अद्याप दिसून येत नाही. शालेय शिक्षण विभागाकडून तशा प्रकारच्या कुठल्याही सुचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचे धोरण कसे व काय राहते याकडे लक्ष लागून आहे. याशिवाय माध्यमिक विभागातर्फे देखील पाचवी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातही कुठल्याही सुचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे माध्यमिक शाळा सुरू होण्याबाबतही आता संभ्रम आहे. दरम्यान, शाळा प्रवेशासाठी संबधीत शाळांकडून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच समाज माध्यमांद्वारे कळविले जात आहे.

Web Title: Classes 6 to 8 will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.