मुलभूत सोयींअभावी नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:13 PM2019-12-11T12:13:02+5:302019-12-11T12:13:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील रस्ते, गटारी व खुल्या जागा विकसित करून नागरी सुविधा उपलब्ध ...

Citizens suffer due to lack of basic facilities | मुलभूत सोयींअभावी नागरिक त्रस्त

मुलभूत सोयींअभावी नागरिक त्रस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील रस्ते, गटारी व खुल्या जागा विकसित करून नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा नागरी आंदोलन उभारले, जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शहरात पालिकेतर्फे विकास कामे करण्यात येत आहेत. प्रभाग पाचमधील निवडक भागातच रस्ते, गटारी आणि खुल्या जागेचा विकास करण्यात आला. उर्वरीत भागाकडे मात्र दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. या भागात पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष केंद्रीत करून रस्ते, गटारी व खुल्या जागेचा विकास करण्याची मागणी निवेदनात केली आहे. प्रभाग क्रमांक पाचमधील पतंजलीनगर सर्वे नं.२०/१ येथील रहिवासी नगरपरिषदेचे सर्व प्रकारचे कर वेळेवर नियमित भरतात. पतंजलीनगर हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असूनही सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अद्याप या भागातील रस्त्यांचे डांबरीकरणही झालेले नाही. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्ते नसल्याने पावसाळ्यात ठिकठिकाणी डबके साचत्ून डासांचा प्रादुर्भाव वाढतो. गटारींची सोय नसल्याने सांडपाण्याचाही गंभीर प्रश्न उद्भवला आहे. दुर्गंधीचे वातावरण तयार झाल्याने नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे या परिसरातील खुल्या जागेची दुरवस्था झाली आहे. या खुल्या जागेचा रहिवाशांना कुठलाही उपयोग होत नाही. या खुल्या जागेवर नगरपालिकेमार्फत विकास करून दिल्यास नागरिकांना त्याचा वापर करता येईल. नगरपरिषदेकडून वरील समस्यांचे त्वरित निराकरण करून विकास कामे करताना कोणताही भेदभाव न करता करावे अन्यथा नागरीकांतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मिलिंद चौधरी, राजेश राठोड, प्रविण सूर्यवंशी, भिमराव मोरे, लक्ष्मण अहिरे, दीपक भोई, जयपालसिंग पवार, विजय निकम, सुरेश सैंदाणे, भावेश पाटील, राकेश जायस्वाल, वासुदेव महाले, संजय चौधरी, अशोक सोनवणे, हेमंत कापडणे, स्वप्नील जायस्वाल, संदीपकुमार पवार, गणेशराम चौधरी, सुनील भांडारकर, राजेश सोनवणे, साबलराम चौधरी आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Citizens suffer due to lack of basic facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.