याबाबत अक्कलकुवा आगारप्रमुख रितेश फुलपगारे यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सकाळपासून प्रवाशांचा प्रतिसाद चांगला होता. औरंगाबाद, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, जळगाव या ठिकाणच्या बसेसला प्रवासी होते. नंदुरबारकडे जाणाऱ्या बसेसला प्रतिसाद होता. कोविड नियमांनुसार बससेवा सुरू केली आहे.
नंदुरबार आगाराचे प्रमुख मनोज खैरनार यांनी सांगितले की, नंदुरबार आगारातून दिवसभरात ६४ फेऱ्या करण्यात आल्या आहेत. यातून १३ हजार किलोमीटर प्रवास झाला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला होता. सुमारे साडेपाच हजार प्रवाशांनी दिवसभरात प्रवास केला.
रेल्वेमध्ये गर्दी कमी
नंदुरबार येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या दीड वर्षात कमी झाली आहे. गुजरातमध्ये जाणे आणि येण्यासाठी केवळ रेल्वेचा पर्याय आहे. बसेस बंद असल्याने रेल्वेत काही अंशी गर्दी आहे. यातही नियमित दैनंदिन धावणाऱ्या चारच गाड्या आहेत. यात मेमो ट्रेन सुरू केल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. परंतु गुजरातमधील रुग्णसंख्यावाढीमुळे अनेक जण प्रवास करणे टाळत आहेत.
याबाबत सुरत ते नंदुरबार दरम्यान रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी जितेंद्र सोनार यांना विचारणा केली असता, अत्यावश्यक काम असल्याने रेल्वे जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
रेल्वे प्रवासी मोहन पटेल यांना विचारणा केली असता, गुजरात राज्यात नियमित मालाच्या खरेदीसाठी जावे लागते. बसेस बंद असल्याने रेल्वे प्रवास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटीने प्रवास करणारे राकेश पाडवी यांना विचारणा केली असता, धुळे येथे महत्त्वपूर्ण काम असल्याने प्रवास करत आहे. सर्व सुरक्षित असल्याचे दिसून आल्यानंतर प्रवासाला सुरुवात केली.
एसटीने प्रवास करणारे सुरेश पाटील यांना विचारणा केली असता अत्यावश्यक सेवा म्हणून एसटीची सेवा चांगली आहे. कोणतीही अडचण नाही. एसटीचा प्रवास हा सुखकर असा आहे.