सोमवारी रात्री लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. वनविभागाचे अधिकारी व ठाणेपाडा ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमातून मंगळवारी सकाळी आठ वाजता ही आग विझवण्यात यश आले. दरम्यान, प्राथमिक अहवालानुसार २५० हेक्टरवर लागवड करण्यात आलेले बांबू रोपवन, सागाची झाडे, गवत आणि ५० हेक्टरवरची पूर्ण क्षमतेने वाढलेली खैरची झाडे आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह वनपाल व वनरक्षक हे रात्रीपासून या परिसरात होते. सकाळी आग आटोक्यात आल्यानंतर ठाणेपाडा रोपवाटिकेच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात आगीचे पंचनामे करण्यात आले. यात सायंकाळपर्यंत पथकांना केवळ १४ हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचता आले होते. बुधवारी उर्वरित ठिकाणी पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत ठाणेपाडा गावाच्या परिसरात शेकडो हेक्टरवर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. या ठिकाणी ही आग लागली होती. ठाणेपाडा गावातील ग्रामस्थांना प्रारंभी वणवा पेटल्याचे दिसून आले. काही वेळात ही आग वाढून साक्री ते नंदुरबार रस्त्याच्या दुतर्फा पोहोचली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती ते दाखल झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व ठाणेपाडा गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु करण्यात आले होते. सर्वांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी आग आटोक्यात आली.
या जंगलात दोन बिबट, काळवीट, सायाळ आणि ५०० पेक्षा अधिक मोर आहेत. हे सर्व प्राणी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी सकाळपासून या भागात पंचनामे करत आहेत. दरम्यान, एका मोराला आगीची झळ बसल्याची माहिती देण्यात आली आहे.
आगीत खाक झालेले बांबू व खैर झाडांचे रोपवन वनविभागाचा अनोखा प्रकल्प होता. यातील गवताची उंची ही पाच फुटांपेक्षा अधिक होती. तसेच सागाची पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाची झाडेही आगीत जळून खाक झाली आहेत.
दरम्यान, आग लागली किंवा लावली गेली याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.