नंदुरबार : निवडणुकीच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे किंवा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याच्या कारणावरून संतप्त शिवसेना पदाधिका:यांनी भाजपच्या नियोजन बैठकीवर बहिष्कार टाकत काढता पाय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 22 एप्रिल रोजी नंदुरबारात जाहीर प्रचार सभा आहे. या सभेच्या नियोजनासाठी बुधवारी नंदुरबारात भाजप व मित्र पक्षाच्या पदाधिका:यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, उमेदवार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, प्रदेश संघटन मंत्री किशोर काळकर, लक्ष्मण सावजी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, डॉ.कांतिलाल टाटीया, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, डॉ.रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते. बैठकीच्या व्यासपीठावरील बॅनरवर केवळ नरेंद्र मोदी व उमेदवार डॉ.हिना गावीत यांचे छायाचित्र होते. युती असतांना मित्र पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांना त्यावर स्थान दिले नाही याबाबत जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, तालुका प्रमुख रमेश पाटील व पदाधिका:यांनी विचारणा केली. भाजप पदाधिका:यांना समपर्क उत्तर देता न आल्याने पदाधिका:यांनी चालू बैठकीतून काढता पाय घेतला. यामुळे बैठकीत काही काळ गंभीर वातावरण निर्माण झाले. शिवसेना पदाधिकारी निघून गेल्यानंतर भाजप पदाधिका:यांच्या उपस्थितीतच पुढे बैठक चालू ठेवण्यात येवून नियोजन करण्यात आले. दरम्यान, आक्रमक शिवसैनिकांनी भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत गांभिर्याने घ्यावे लागेल असा इशारा देत सुरुवातीपासूनच भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला.
भाजप व सेनेत ‘बॅनर’ वॉर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:08 IST