यासंदर्भात जान्या पाडवी व ग्रामस्थांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजबर्डी जिल्हा परिषद गटअंतर्गत केवळ मुंगबारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राला उमराणी बुद्रुक, उमराणी खुर्द, आरपा, लटकुवा, आमला, पालीखेत, बिलबहाडपाडा यासह परिसरातील पाडे व गावे जोडली आहेत. भौगोलिकदृष्ट्या अनेक गावांचे अंतर आरोग्य केंद्रापासून लांब आहे, तसेच लोकसंख्येचा विचार करता या भागात पुन्हा नवीन एक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे. यासंदर्भात पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, तसेच जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी व जि. प. सदस्यांपुढे या भागातील दौऱ्याप्रसंगी नागरिकांनी आरोग्याचे प्रश्न मांडले होते. त्यावेळी स्वतंत्र आरोग्य केंद्र व्हावे, याबाबत चर्चाही झाली असून, पालकमंत्र्यांनीही आश्वासन दिले होते, तसेच त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राजबर्डी जिल्हा परिषद गटात आमला येथे स्वतंत्र आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे करीत आहोत. मुंगबारी आरोग्य केंद्रापासून लांब असलेली गावे आमला आरोग्य केंद्राला जोडता येतील. त्यामुळे परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतील. याबाबत गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आमला येथे स्वतंत्र आरोग्य केंद्र मंजूर करा- ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST