सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहादा तालुक्यातील राणीपूर येथे जुलै महिन्यात पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, खासदार डॉ. हीना गावित यांच्या उपस्थितीत राणीपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य केंद्राची इमारत प्रशस्त असून ऑपरेशन थिएटर, महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष, सभागृह, स्वच्छतागृह, कर्मचाऱ्यांसाठी निवास आदी सुविधा उपलब्ध असून केंद्राच्या आवारात लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे.
राणीपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या चार गावे व १६ पाड्यांची १४ हजारापर्यंत लोकसंख्या आहे. दुर्गम भागातील नागरिकांसाठी हे आरोग्य केंद्र सोयीचे ठरत आहे. मागील काही दिवसांपासून या रुग्णालयात गर्भवती मातांची प्रसूतींची संख्याही वाढत आहे. या भागातील रुग्णांच्या सेवेसाठी डॉ.जयदेव ठाकरे, डॉ. शशिकांत चौधरी या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका, परिचर आदी आरोग्य कर्मचारी प्रतिनियुक्तीवर या केंद्रात सेवा देत आहेत. अशा प्रतिनियुक्तीमुळे सेवा कार्यात कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. त्यामुळे या आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्रपणे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे असून सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिकांची व रुग्णांची सोय व्हावी, रुग्णवाहिकाअभावी येणाऱ्या अडचणी थांबाव्यात म्हणून राणीपूर आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी स्वतंत्र रुग्णवाहिकेची गरज आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती व रुग्णवाहिका देण्यासाठी संबंधितांनी पावले उचलणे गरजेचे आहे.