नंदुरबार : एकीकडे दुष्काळाशी जनता दोन हात करीत असतांना दुसरीकडे येत्या खरीप हंगामाची देखील तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरपेक्षा अधीक खरीप क्षेत्रासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे व खतांचे नियोजन देखील करून ठेवले आहे. जिल्ह्याला यंदाच्या खरीप हंगामासाठी ३७ हजार ७८३ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असून महाबीजकडून व खाजगी कंपन्यांकडून त्याची उपलब्धता होणार आहे.अवघ्या दीड महिन्यावर येवून ठेपलेल्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांप्रमाणेच प्रशासन देखील सज्ज होत आहे. सध्याच्या दुष्काळाला तोंड देत आगामी खरीपासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पातळीवर शेतातील कामे सुरू केली आहे तर प्रशासनाने बियाणे व खते उपलब्ध व्हावे यासाठी नियोजन केले आहे.नंदुरबार जिल्ह्याच्या जमिनीचा विचार करता जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, कापूूस, भात, सूर्यफूल, मका, मूग, सोयाबीन, उडीद, तूर, भुईमूग आदी प्रमुख पीके घेण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासूून कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यांचे क्षेत्र कमी झाले आहे.कापसाच्या क्षेत्र वाढीसोबतच या पिकांचे क्षेत्र देखील टिकून राहावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.३७ हजार ७८३ क्विंटल बियाणेजिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार ९०० हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. दरवर्षी यापेक्षा अधीक क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली जाते. या एवढ्या क्षेत्रासाठी साधारणत: ३७ हजार ७०० क्विंटल बियाणे लागत असतात. यंदा देखील कृषी विभागाने तेव्हढ्याच बियाण्यांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तालयाने ही मागणी मंजुर करून महाबीजमार्फत ती पुरविली जाणार आहेत.गेल्या खरीप हंगामात २९ हजार १२७ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता झाली होती. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून या बियाण्यांची पुरेशा प्रमाणात व योग्य वेळी पुर्तता करण्यात आल्याने बियाण्यांची टंचाई भासली नाही.दरम्यान, जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी मे महिन्यात अर्थात उन्हाळी कापूस लागवड करीत असतात. त्यामुळे येत्या आठवडाभरात बी.टी.कापसाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अनेक शेतकºयांच्या विहिरी, कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी कापूस लागवड कमी होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
खरीपसाठी ३७,८०० क्विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:31 IST