लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा झालेल्या पावसामुळे शेतशिवारातील पिके मजबूत झाली असून यातून 100 टक्के उत्पादन येण्याचा अंदाज असल्याने सर्व 857 खरीप गावांची पैसेवारी ही 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचे जाहिर करण्यात आले आह़े प्रशासनाकडून सोमवारी नजर पैसेवारी जाहिर करण्यात आली आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरीच्या 108 टक्के पाऊस कोसळला आह़े या पावसामुळे पेरणी झालेल्या दोन लाख 88 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची स्थिती मजबूत झाली होती़ या पिकांचा अंदाज घेत महसूल प्रशासनाने गावनिहाय पैसेवारी जाहिर केली आह़े यानुसार जिल्ह्यातील 857 खरीप आणि 30 खरीप गावांमधील स्थिती चांगली असल्याचे दिसून आल्यानंतर या गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े यातील काही गावांची स्थिती मजबूत असून त्यांची पैसेवारी 70 पैश्यांर्पयत गेल्याची माहिती देण्यात आली आह़े प्रशासनाचा हा प्राथमिक अंदाज असला तरी गेल्या तीन वर्षानंतर शेतीक्षेत्रासाठी हा दिलासादायक असाच अंदाज आह़े गेल्यावर्षी चार तालुके भीषण दुष्काळग्रस्त तर दोन तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती होती़ परंतू यंदा पावसाने उशिरा का, होईना लावलेल्या हजेरीमुळे दुष्काळचक्र खंडीत झाले आह़े
जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून प्राप्त अहवालानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सोमवारी जिल्ह्याची 2019-20 या वर्षाची प्राथमिक नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 155 गावांपैकी 145 खरीप आणि 10 रब्बी गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े नवापूर तालुक्यातील सर्व 165 खरीप गावांची स्थिती मजबूत असल्याचा अंदाज असून सर्व गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े तळोदा तालुक्यातील सर्व 94 खरीप गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आह़े शहादा तालुक्यातील 160 खरीप आणि 20 रब्बी गावांची स्थिती मजबूत असल्याची माहिती देण्यात आली आह़े या गावांची पैसेवारी ही 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े शहादा तालुक्यातील तापी काठासह उत्तर भागातील गावांमध्ये पिकांची स्थिती चांगली आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात अक्कलकुवा तालुक्यातील सर्व 194 तर धडगाव तालुक्यातील सर्व 99 खरीप गावांची पैसेवारीही यंदा 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज महसूल विभागाने वर्तवला आह़े
येत्या तीन महिन्यानंतर अंतिम आकडेवारी जाहिर होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े तोवर पिकांची स्थिती आणखी मजबूत होणार असल्याने पैसेवारी स्थिर राहणार आह़े महसूल विभागाने घेतलेल्या नजर पैसेवारीत 30 रब्बी गावांचीही स्थिती तपासून तेथील पैसेवारी जाहिर केली आह़े जिल्ह्यात यंदा 106 टक्के पेरण्या झाल्या आह़े तब्बल 2 लाख 88 हजार 804 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत़ सरासरीच्या सहा टक्के अधिक पेरणी क्षेत्र हे पावसामुळे वाढल्याचे सांगण्यात आले आह़े कापूस आणि सोयाबीनसह इतर खरीप पिकांना पावसाचा लाभ मिळाल्याने शेतशिवारातील त्यांची स्थिती मजबूत आह़े सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे कीड रोग तसेच इतर कीडीचे आजार पिकांवर यंदा फोफावू शकलेले नसल्याने पिकांची स्थिती दोन महिन्यानंतरही चांगली आह़े