सोमावल येथे उपाययोजनांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:20 PM2020-05-28T12:20:00+5:302020-05-28T12:20:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/तळोदा : ७३ अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत असतांनाच सोमावल येथील गर्भवती महिलेचा नाशिक येथे ...

Accelerate measures at Somaval | सोमावल येथे उपाययोजनांना गती

सोमावल येथे उपाययोजनांना गती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/तळोदा : ७३ अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत असतांनाच सोमावल येथील गर्भवती महिलेचा नाशिक येथे उपचार घेतांना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या महिलेने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात देखील उपचार घेतला होता. महिलेच्या संपर्कातील ७ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून गावात निर्जंतुकीकरण करून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. महिलेचे माहेर आश्रवा, ता.कुकरमुंडा येथेही आरोग्य प्रशासनाने कळविले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ७३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला होता. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र त्याचवेळी सोमावल, ता.तळोदा येथील ४२ वर्षीय गर्भवती महिलेचा कोरोना पॉझिटिव्हमुळे मृत्यू झाल्याची माहिती नाशिक प्रशासनाने कळविल्याने खळबळ उडाली.
सोमावल खुर्द येथील ४२ वर्षीय महिला गर्भवती होती. जानेवारी महिन्यात सोमावल आरोग्य केंद्रात तीची तपासणी करून उपचार करण्यात आले होते. त्यानंतर १५ एप्रिल ला आश्रवा, ता.कुकरमुंडा येथे माहेरी पाठविण्यात आले होते. तेथे छातीत दुखण्याचा त्रास झाल्याने नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. नंतर घोटी येथील रुग्णालयात ३ मे रोजी नेण्यात आले. तेथून महिलेला घरी आणले. २१ मे रोजी पुन्हा त्रास झाल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हृदयरोगाचा त्रास असल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी महिलेला पाठविण्यात आले. तेथे उपचार घेतांना महिलेचा २७ रोजी सकाळी मृत्यू झाला. या महिलेचा कोरोनाचे प्राथमिक लक्षणे देखील आढळून आले होते. त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयाने स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. ते पॉझिटिव्ह आले होते. या महिलेला नाशिक येथेच कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयाने दुपारी ही बाब नंदुरबार जिल्हा प्रशासनाला कळविले. लागलीच तळोदा आरोग्य विभागातर्फे सोमावल येथे उपाययोजनांना गती देण्यात आली. तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, पोलीस निरिक्षक शिंगोटे यांनी गावात भेट देवून उपाययोजनांचा आढावा घेतला. महिलेच्या कुटूंबातील सात जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले. आरोग्य विभागाचे डॉ.विशाल चौधरी, डॉ.सुशिल ठाकरे, डॉ.कृष्णा पावरा, डॉ.दिलीप पाडवी, डॉ.गौरव सोनवणे, राहुल माळकर, मनोज पिंजारी, अरुणा कुवर, डी.डी.आमळे यांनी आरोग्य तपासणी सुरू केली आहे,

कोरोनाचे प्रलंबीत अहवाल अखेर बुधवारी सकाळी प्रशासनाला प्राप्त झाले. तब्बल ७३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. आलेल्या सर्व अहवालांमध्ये पॉझिटिव्ह नऊ रुग्णांच्या संपर्क साखळीतील लोकांचा समावेश आहे. त्यामुळे नंदुरबार, रजाळे व पॉझिटिव्ह रुग्ण शहादा तालुक्यातील ज्या गावांमध्ये गेला होता त्या गावातील ग्रामस्थांना हायसे वाटले आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या स्वॅब अहवालाचा देखील त्यात समावेश आहे.

Web Title: Accelerate measures at Somaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.