लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा कहर सुरू असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी यंदाही मजूर आतापासूनच परजिल्हा व परप्रांतात स्थलांतर करू लागले आहे. शहादासह धडगाव तालुक्यातील काही गावांमधून मजूर स्थलांतर सुरू झाले आहे.यंदाचा कोरोनाचा कहर सुरू असल्याने उन्हाळ्यात अर्थात मजुर परतल्यावर जिल्ह्यात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले होते. नाशिक विभागात नंदुरबार जिल्हा मजुर संख्येबाबत आघाडीवर होता.परंतु आता रोहयोची कामे मंदावल्याने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून मजुरांचे स्थलांतर होते. यंदा मात्र सप्टेंबर महिन्यातच स्थलांतर सुरू झाले आहे. वास्तविक खरीप पीक काढणी अद्याप बाकी आहे. शेतात मोठ्या प्रमाणावर कामे उपलब्ध आहेत. असे असतांना आतापासूनच मजुरांचे स्थलांतर होत असल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे. अनेक मजूर ठेकेदार हे गावोगावी फिरून मजूर मुकादम यांच्याशी संपर्क करून मजुरांची नोंदणी करून घेत आहेत. गुजरात, कर्नाटकसह राज्यातील मराठवाडा भागात या मजुरांना कामासाठी नेले जाते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने या मजुरांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
रोजगारासाठी पुन्हा परप्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:38 IST