८२ बचत गट कर्जाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:11 PM2020-07-06T12:11:06+5:302020-07-06T12:11:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील ८२ महिला बचत गटांची कर्ज प्रकरणे आॅनलाईन प्रक्रियेने संबंधीत ग्रामीण भागातील बँकांमध्ये दाखल ...

82 savings groups waiting for loans | ८२ बचत गट कर्जाच्या प्रतिक्षेत

८२ बचत गट कर्जाच्या प्रतिक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील ८२ महिला बचत गटांची कर्ज प्रकरणे आॅनलाईन प्रक्रियेने संबंधीत ग्रामीण भागातील बँकांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता संबंधीत बँक प्रशासनाने तातडीने पुढील कार्यवाही करून कर्जे उपलब्ध करून द्यावीत, अशी या बचत गटांची मागणी आहे. दरम्यान तालुक्याला दिलेल्या उद्दिष्टपूर्तीस अधिक गती देण्याची अपेक्षाही बचत गटांनी केली आहे.
तळोदा पंचायत समितीमार्फत तालुक्यातील ग्रामीण भागात साधारण एक हजार ४०० महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या बचत गटातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने महिला ग्रामोन्नती अभियान २०१७ पासून सुरू केले आहे. या अभियानामार्फत बचत गटातील महिलांना आपल्या गावाच्या कार्यक्षेत्रातील राष्टÑीकृत अथवा सहकारी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देत असते. या अभियानाच्या माध्यमातूनच तळोदा तालुक्याला साधारण ३५० महिला बचत गटांचे कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट्य तळोदा पंचात समितीला देण्यात आले होते. मार्च महिन्यात हे उद्दिष्ट देण्यात आले होते.
तथापि कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे बचत गटांच्या कागद पत्रांची जुळवणी करण्यात अडचणी आल्या होत्या, असे असले तरी तालुक्यातील ८२ बचत गटांनी आपल्या महिलांचे कागद पत्रांची पूर्तता करून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांमध्ये आॅनलाईन प्रणालीतून प्रस्ताव सादर केले आहेत. जवळपास ९० लाखांची कर्ज प्रकरणे महिला बचत गटांनी केले आहेत. आता त्यांना कर्जाची प्रतीक्षा लागून आहे. ज्या बँकांकडे कर्जाचे प्रस्ताव दाखल केले आहेत तेथील बँक प्रशासनाने त्यावर तातडीने पुढील कार्यवाही करण्याची अपेक्षा बचत गटातील महिलांनी केली आहे. कारण महिला बचत गटांच्या कर्ज मंजुरीबाबत बँक प्रशासन नेहमीच उदासिन भूमिका घेत असते. यासाठी महिलांना सतत बँकांकडे थेटे घालावे लागत असल्याचा अनुभव त्या सांगतात. एवढे करूनदेखील यश येत नसल्याची व्यथाही बचत गटातील महिलांनी बोलून दाखविली आहे. आता राज्य शासनाने बचत गटातील महिलांच्या सक्षमी करणासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. त्यामुळेच महिला बचत गटातील महिलांमध्ये आपल्या कर्जाची आशा पल्लवीत झाल्या आहेत. तथापि यासाठी पंचायत समिती प्रशासनाबरोबर जिल्हा प्रशासनानेदेखील बँकांशी नियमित समन्वय ठेवून पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. ज्या बँका उदासिन भूमिका घेईल त्यांच्यावर कायदेशीर ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षाही बचत गटांनी केली आहे. आधीच कर्ज प्रकरणी कागद पत्रांची जुळवणी करताना दमछाक करावी लागली होती.
बचत गटातील प्रत्येक महिलांचे आधारकार्ड, पासपोर्ट फोटोज, बँक खाते व इतर तत्सम कागदपत्रे जमा करावीत लागली आहे. त्यामुळे बँक प्रशासनांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची अपेक्षा या महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाच्या महिला ग्रामोन्नती अभियानातून तळोदा तालुक्यातील ३५० महिला बचत गटांना कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु त्यापैकी आतापावेतो केवळ ८२ बचत गटांची कर्जाची प्रकरणे बँकांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना महामारीमुळे या प्रक्रियेला बाधा आली असली तरी उद्दिष्ट पूर्तीसाठी गती देण्याची आवश्यकता आहे. संबंधीत यंत्रणा मेहनत घेत असली तरी बचत गटातील महिलांनीदेखील आपल्या कागद पत्रांच्या पूर्ततेसाठी त्यांना मदत केली पाहिजे. याशिवाय तालुक्यातील बचत गटांची संख्या लक्षात घेऊन वरिष्ठ प्रशासनानेही उद्दिष्ट्य वाढविण्याची महिला बचत गटांची मागणी आहे. तसे तळोदा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. शिवाय आदिवासी महिला बचत गटांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे कर्ज उद्दिष्ट्याबाबत संबंधीत यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा आहे.

Web Title: 82 savings groups waiting for loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.