१ जूनपासून लॅाकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर ३ जूनपासून नंदुरबार, शहादा, नवापूर व अक्कलकुवा आगाराने काही बसफेऱ्या सुूरू केल्या. जवळपास ५० फेऱ्यांमध्ये २० फेऱ्या या आंतरजिल्हा होत्या तर ३० फेऱ्या या जिल्हाअंतर्गत होत्या. त्यासाठी १२५ कर्मचारी नियुक्त होते. नंदुरबार आगारातून २४ फेऱ्या होत होत्या. त्यासाठी ४८ कर्मचारी होते.
शहादा आगारातून साधारण अडीचशे किलोमीटर अंतरावरील शिरपूर, धुळे व नाशिक अशा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. सोमवार ७ जून पासून जळगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत जिल्हा अंतर्गत व जिल्ह्याबाहेर बससेवा सुरू असली तरी एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ २० कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत असून दररोजच्या नियमित शंभरपैकी फक्त दहा शेड्यूल कार्यरत आहेत. नवापूर आगारातूनदेखील आठ फेऱ्या झाल्या व २० कर्मचारी होते. अक्कलकुवा आगारात सहा फेऱ्या झाल्या.