नंदुरबार : ब्राम्हणवेल येथून खापरखेडा येथे जात असलेला ट्रक उलटून एकजण ठार तर ३५ जण जखमी झाल्याची घटना रनाळे-वटबारे रस्त्यावरील चढावावरील वळणावर घडली. याबाबत रात्री उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
दुपारी १ वाजता ही घटना घडली. चढावावरील वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक (क्रमांक जीजे ७- झेड९८२७) उलटला. त्यात बसलेले ३५ जण गंभीर जखमी झाले तर एका बालकाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. मयताचे नाव स्वप्नील ग्यानदेव भील (१६)रा.दहिवेल, ता.साक्री असे आहे. जखमींमध्ये सुनील अंबरसिंग ठाकरे, अरुण अशोक ठाकरे, अरुणा प्रवीण चौधरी, रवींद्र वसंत सोनवणे, पुनाबाई नाना सैंदाळे, अनुसया पिंटू शिंदे, हिराबाई शिवा सोनाने, पिंटू सोनाने, गोरख पोपट चौधरी, धनराज संजू सैंदाळे, अशोक बहिरम चौधरी, अर्जून प्रवीण चौधरी, जुमन रमण सोनावणे, दिपक नंदू चौधरी, जित्या अभ्या ठाकरे, संजय चंदू मालचे, श्रावण संग्राम ठाकरे, शंकर शामा सैंदाळे, आशाबाई रावसाहेब सोनावणे, राहुल रावसाहेब सोनावणे सर्व रा.ब्राम्हणवेल, लक्ष्मण शंकर मालचे रा.खराडबारी, जितू तुकाराम चौरे रा.बंधारपाडा, वनाबाई पिंटू ठाकरे, पिंटू चिंतामण ठाकरे, नंदा पिंटू ठाकरे सर्व रा.आमखेल यांचा समावेश आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक तेथून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.