३१५ कोविड बेडसाठी २६ डॉक्टर नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 09:03 PM2020-08-05T21:03:09+5:302020-08-05T21:03:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी तीन कोविड सेंटर निर्माण करुन ३१५ बेडची ...

26 doctors appointed for 315 covid beds | ३१५ कोविड बेडसाठी २६ डॉक्टर नियुक्त

३१५ कोविड बेडसाठी २६ डॉक्टर नियुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी तीन कोविड सेंटर निर्माण करुन ३१५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ या प्रत्येक सेंटरवर सात दिवसांसाठी सात डॉक्टर नियुक्त असून एकूण २६ डॉक्टरांवर कोविड कक्षांची भिस्त आहे़
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोरोना संसर्गबाधितांचे प्रमाण हे नंदुरबारात आजतरी मर्यादित आहे़ यातून आरोग्य सेवेवर खूप मोठा ताण आलेला नाही़ परंतू डॉक्टरांच्या नियुक्त्या करणे आणि त्यांच्याकडून सेवा करवून घेण्यात मात्र आरोग्य यंत्रणेला अडचणी असल्याचे चित्र असून जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारित असलेल्या ८९ डॉक्टरांना वेळोवेळी कोविड कक्षांमध्ये नियुक्त करण्यात येत असून ही संख्या अपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे़ कोविड कक्षांमध्ये डॉक्टर व्यस्त होत असल्याने जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्या ओपीडीवर त्याचा परिणाम जाणवत असल्याचे चित्र आहे़


१नंदुरबार येथील कोविड हॉस्पिटलमध्ये १२० बेडची सोय आहे़ याठिकाणी आयसीयूचे २६, आयसोलेशन ३२ तर नर्सिंग कॉलेजमध्ये ६२ बेड आहेत़ या सर्व १२० बेडसाठी १ एमडी, ३ एमबीबीएस व एक एमडी भूलतज्ञ अशा पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सोबत १२ स्टाफनर्स नियुक्त आहेत़
२एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल येथील कोविड केअर सेंटरमध्ये १३५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ यासाठी दररोज १ एमबीबीएस, तीन बीएमएमस तर १२ स्टाफनर्स अशा १६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते़
३शहादा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सात दिवस १ एमबीबीएस, ३ बीएमएमएस डॉक्टर तर १० स्टाफनर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे़


जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्ष तसेच एकलव्य कोविड केअर सेंटर याठिकाणी १४१ तर शहादा येथील कक्षात ५१ असे १९३ रुग्ण उपचार घेत आहेत़
जिल्ह्यात आजअखेरीस ६५३ जणांना लागण झाली होती़ यातील ४०१ रूग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत़ तिन्ही कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णात नंदुरबार येथील ११९, शहादा ४९, तळोदा १५, नवापूर ७ तर अक्कलकुवा येथील दोघांचा समावेश आहे़
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात पाच, एकलव्य केअर सेंटरमध्ये ४ तर शहादा येथे ४ अशा १३ जणांचे पथक उपचार देण्यासाठी तैनात करण्यात येते़ सात दिवस हे अधिकारी याठिकाणी कार्यरत असतात़ सात दिवसांची ड्यूटी संपल्यानंतर त्यांना सात दिवस त्याच भागात क्वारंटाईन करुन स्वॅब टेस्ट करुन घरी सोडण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़


एकीकडे डॉक्टरांची मर्यादित संख्या असताना १० कोरोना बेडसाठी १ सिस्टर अशी तरतूद केल्यास बाधितांवर उपचार सोपे होतात़ मात्र तूर्तास जिल्ह्यातील कोविड सेंटर्समध्ये २० बेडमागे एक सिस्टर अर्थात परिचारिका काम करत असल्याचे दिसून आले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित असलेल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेल्या २१ वर्षात वैद्यकीय अधिक्षकांची पदे न भरणे आता त्रासदायक होत असून प्रभारी राजमुळे या रूग्णालयांचे कामकाज ऐन कोरोना काळात अडचणीत येत असल्याची माहिती समोर आली आहे़

Web Title: 26 doctors appointed for 315 covid beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.