लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : शहरालगत उच्छलच्या पाड्यावरील कोरोना पॉझीटीव्ह २४ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या राज्यातील १६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दोन राज्यांच्या सीमेवर घडलेल्या या प्रकारामुळे दोन्हीकडून उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.गुजरातमधील उच्छलच्या हनुमानफळीत राहणारी २४ वर्षीय महिला गुजरातच्या अहमदाबाद येथून १८ मे रोजी परतली होती. होम क्वॉरंटाईन केलेल्या या महिलेस २२ मे रोजी ताप आल्याने स्वॅब घेण्यात आला. २३ मे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच धावपळ झाली. शहरातील रेल्वेस्थानक समोरील वसाहत व हनुमानफळी हा भाग लागून आहे़ समोर वाकीपाडा ही नवापुर तालुक्यातील करंजी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणारी लोकवस्ती आहे़ उच्छल येथील तालुका प्रशासनाने हनुमानफळी सील करुन उच्छल शहर बंद न करता उच्छलच्या सर्व पाडयांवर औषध फवारणी हाती घेउन इतर आवश्यक कार्य लागलीच हाती घेतले. नवापुरच्या स्थानिक प्रशासनाने वाकीपाडा, रेल्वेस्थानक परिसर सील करुन संबंधित महिलेच्या संपर्कात कोण कोण आले याची माहिती काढली. लागून असलेल्या या वसाहतीमधून शहर व तालुका हद्दीतील १६ जणांचा संपर्क आढळून आल्याने त्या सर्वांना वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असुन त्याच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. रेल्वेस्थानक परिसर लागुन असल्याने हा परिसर कंटेंटमेंट झोन तर समोरील वाकीपाड्याचा भाग बफर झोन घोषीत आहे़ परिसरात आरोग्य तपासणीचे कार्य हाती घेतले आहे. मंगळवारपर्यंत ही तपासणी पुर्ण करण्याचे नियोजन स्थानिक प्रशासनाने केले आहे. येत्या दोन आठवड्यापर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. खबरदारी म्हणुन प्रशासनाकडुन उपाय योजना केल्या जात असुन नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व तहसिलदार सुनिता जºहाड यांनी कळवले आहे़दरम्यान उच्छल येथील महिलेच्या एक वर्षाच्या बाळासह पतीचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती गुजरात आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे़ ही बाब नवापुर शहर आणि तालुक्यासाठी दिलासादायक असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
नवापुरातील १६ जण क्वारंटाईन कक्षात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:08 IST