शहादा : तालुक्याच्या उत्तर भागात गोमाई नदीवर मिनी बॅरेज बांधून सिंचनाची सोय उपलब्ध करुन द्यावी अन्यथा लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणार नाही, असा पवित्रा ११ गावच्या ग्रामस्थांनी घेतला आहे़ ११ ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ यांनी तहसीलदार यांना निवेदन देत हा इशारा दिला आहे़शहादा तालुक्यातील दामळदा, गोगापूर, टूकी, भागापूर, वडवी, तिधारे, कुरंगी, भोरटेक, ओझर्टा, चिखली आणि जाम या गावांमध्ये गेल्या काही वर्षात भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ पिण्यासोबतच शेतीसाठीही पाणी मिळत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत़ या पार्श्वभूमीवर याभागात गोमाई आणि उंबरी नदीवर मिनी बॅरेज अर्थात चेकडॅम बांधण्याची २० वर्षांपासूनची मागणी आहे़ यासाठी या गावांनी सातत्याने पाठपुरावाही केला आहे़ परंतू कारवाई झालेली नाही़ यातून मार्ग निघत नसल्याने या गावांनी एकत्र येत ठराव करत लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याची तयारी दर्शवली आहे़ निवेदन तहसीलदार मनोज खैरनार यांना देण्यात आले असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे़निवेदनावर दामळदा सरपंच हरिराम मालचे, उपसरपंच डॉ़ विजय नामदेव चौधरी, गणपत ठाकरे, भरत सजन पाटील, रंजना तुंबडू पाटील, द्वारकाबाई हरिराम मालचे, ओझर्टा सरपचं गणेश पंडीत वळवी, उपसरपंच भरत जाहग्या पवार, जाम गावचे सरपंच ईश्वर शिवाजी वाघ, उपसरपंच सुनील पवार, भोरटेक सरपंच गिताबाई जयसिंग पवार, उपसरपंच सुनील जगतसिंग पवार, ईश्वर जयराम वसावे, महेंद्र शेमळे, प्रदीप बोरसे, गोगापूरच्या सरपंच यमुनाबाई सोनवणे, टूकीच्या सरपंच संगिताबाई पवार, भागापूरचे सरपंच रमेश पवार, उपसरपंच निलेश मगन पाटील यांच्या ११ गावातील ग्रामस्थांच्या सह्या आहेत़
मिनी बॅरेजसाठी ११ गावच्या ग्रामस्थांनी दिला निवडणूकीवर बहिष्काराचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:25 IST