नांदेड : शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी भरदिवसा एका तरुणीचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. घटनेची गंभीर दखल घेत अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत तरुणीची सुखरूप सुटका केली. यातील मुख्य आरोपी मोहम्मद खाजा याची आज पोलिसांनी त्याच परिसरात बेड्या ठोकून धिंड काढली.
ही घटना बुधवारी (दि. ३०) सायंकाळच्या सुमारास घडली. नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावरून जात असताना दोन तरुणांनी एका तरुणीला जबरदस्तीने उचलून दुचाकीवर बसवले. तरुणीने विरोध केला तरीही तिला फरफटत नेण्यात आले. या प्रकाराचा थरकाप उडवणारा व्हिडीओ काही क्षणांत सोशल मीडियावर व्हायरल झाला.
घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस तत्काळ सक्रिय झाले. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. या तपासात अवघ्या काही तासांत पोलिसांनी तरुणीची सुखरूप सुटका केली.
त्याच ठिकाणी काढली धिंडया प्रकरणी 23 वर्षीय मोहम्मद खाजा आणि एक अल्पवयीन आरोपी यांना वजिराबाद पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आज (गुरुवार) मुख्य आरोपी मोहम्मद खाजा याला घटनास्थळी म्हणजेच रेल्वे स्टेशन परिसरात बेड्या ठोकून फिरवले. नागरिकांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्याची धिंड काढत जाहीर संदेश दिला की महिलांच्या सुरक्षेशी खेळल्यास कायदा कोणालाही सोडत नाही.
दोघांची होती ओळखदरम्यान, प्राथमिक तपासात आरोपी व पीडित तरुणी यांची पूर्वीपासून ओळख होती. आरोपी खाजा तिला भेटायला गेला असता त्यांच्यात वाद झाला आणि संतप्त होऊन त्याने तिचे अपहरण केले, असे पोलिसांनी सांगितले.