महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लसीकरणात राजकारण केल्या जात आहे. जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात लसींचे डोस उपलब्ध आहेत, अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले आहे. यावर भाष्य करतांना वसंतराव चव्हाण म्हणाले की, जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ४९ लाखांच्या आसपास आहे. त्यातील ११ लाख ५९ हजार व्यक्ती या ४५ वर्षांच्या वरील आहेत. या सर्वांना मोफत लस देता यावी, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय या चार ठिकाणांसह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, शहरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केेंद्र, आरोग्य उपकेंद्र अशा एकूण ४७८ आरोग्य संस्था जिल्ह्यामध्ये कार्यरत असून, त्यापैकी ३९६ ठिकाणी लसीकरणाचे केंद्र उघडण्यात आले आहे.
या लसीकरण केंद्रांवर दररोज १८ ते २० हजार व्यक्तींचे लसीकरण करू शकतो. त्यासाठी जिल्ह्याला दर दहा दिवसांना २ लाख लसींची गरज आहे, परंतु वास्तवात प्रत्येक दहा दिवसांसाठी केवळ ३० ते ४० हजार लसींचे डोस उपलब्ध होत आहेत. याचाच अर्थ, एकूण क्षमतेच्या केवळ दहा टक्के लस पुरवठा केंद्र शासनाकडून होत आहे. तरीही लसीची मुबलकता असल्याचे माध्यमांना सांगून जिल्ह्यातील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार खा.प्रताप पाटील चिखलीकरण यांनी करू नये, असा सल्ला माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी दिला आहे.
कोरोनासारख्या महामारीत राजकारण करण्यापेक्षा केंद्र शासनाकडून जास्तीच्या लसी मिळवून देण्यात खा.चिखलीकरांनी अधिक लक्ष घालणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.