लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा-सध्या थंडीचा ज्वर वाढला असल्याने गहू ,हरभरा या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोहा शहरातील बेनाळ परिसरातील पीक बहरले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
लोहा शहरातील बेनाळ परिसरात यंदा परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. दरम्यान पावसामुळे या भागातील विहिरी ,तलाव ,नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली आहे .पाणी पातळीत वाढ झाल्याने सिंचनाचा आधार असलेल्या शेतकऱ्यांनी गहू पेरणीस प्राधान्य दिले.
सध्या मुबलक पाणी व पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक चांगले बहरात असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
परतीच्या जोरदार पावसामुळे लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. तलावातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाले. या पाण्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी गहू ,हरभरा या पिकाची पेरणी केली आहे.परंतु लिंबोटी धरणाच्या एकूण किती पाणी पाळ्या आहेत हे अद्यापही कळाले नाही. यामुळे येत्या चार आठ दिवसात पाणी न सुटल्यास भरलेले बहरलेली पिके वाळून जातात की काय ? असे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.