कंधार (जि.नांदेड) : मनगटात बळ नाही म्हणून काय झालं, पंखात भरारी घेण्याची जिद्द अजूनही कायम आहे.’ याचीच प्रचीती मंगळवारी कंधार तालुक्यातील शिवाजी कॉलेज नवरंगपुरा येथे पाहायला मिळाली. बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी, जन्मताच दोन्ही हात नसलेल्या सूरज शिवराज उबाळे या दिव्यांग विद्यार्थ्याने चक्क पायाने इंग्रजीचा पेपर लिहून उपस्थित सर्वांची मने जिंकली.
मंगळवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेचा पहिलाच दिवस आणि कठीण समजला जाणारा इंग्रजीचा विषय़, त्यामुळे अनेक विद्यार्थी दडपणाखाली असतात. मात्र नवरंगपुरा येथील श्री शिवाजी कॉलेज केंद्रावर वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. या विद्यार्थ्याला निसर्गाने दोन्ही हात दिले नाहीत. मात्र त्याने या उणीवेला कधीही आपले अपयश मानले नाही.
अपंगत्व हे शरीराला असते मनाला नाही....माझा मुलगा जन्मताच दिव्यांग आहे. त्याचे पायच हात आहेत. दहावीला त्याने ६४ टक्के मार्क घेतले होते. माझ्या मुलाची जिद्द पाहून आजच्या पिढीने खूप काही शिकण्यासारखे आहे. त्याची ही धडपड समाजासाठी प्रेरणादायी असून याचा मला अभिमान आहे, असे वडील शिवराज उबाळे यांनी सांगितले.
पायांच्या बोटांत धरली लेखणी...वर्गातील इतर विद्यार्थी बाकावर बसून हातांनी पेपर लिहीत असताना सूरज मात्र बाकावर बसून मोठ्या एकाग्रतेने आपल्या पायाच्या अंगठ्यात पेन धरून शब्दांमागून शब्द कागदावर उतरवत होता. त्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि लिहिण्याचा वेग पाहून परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, केंद्र संचालक अशोक वरपडे, प्राचार्य मुरलीधर घोरबांड आणि शिक्षण विस्तार अधिकारी थक्क झाले.
स्वाभिमानी विद्यार्थीसूरज दिव्यांग असल्यामुळे त्याला परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी लेखनिक घेता आला असता; परंतु त्याने स्वाभिमानाने आणि ताठ मानेने आहे त्या व्यंगत्वावर मात करत पुढे जाण्याचा आणि परिस्थितीशी दोन हात करत लढण्याचा जगाला संदेश दिला आहे. - प्राचार्य मुरलीधर घोरबांड, श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कंधार
Web Summary : Suraj Ubale, born without hands, wrote his 12th-grade English exam with his feet in Kandhar. His determination inspired everyone, proving disability doesn't hinder dreams. He chose self-reliance over a scribe.
Web Summary : कंधार में सूरज उबाले, जो बिना हाथों के पैदा हुए, ने पैरों से 12वीं कक्षा की अंग्रेजी की परीक्षा लिखी। उनकी दृढ़ता ने सभी को प्रेरित किया, यह साबित करते हुए कि विकलांगता सपनों को नहीं रोकती। उन्होंने लेखक से अधिक आत्मनिर्भरता को चुना।