हदगाव (जि.नांदेड) : बस थांबा असतानाही हात दाखवूनही चालक बस थांबवत नसल्यामुळे शाळा, महाविद्यालयात जाण्यास विद्यार्थींना उशीर होतो तसेच विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र बस सुरू व्हावी या मागणीसाठी श्री दत्त महाविद्यालयासह अन्य काही शाळेच्या संतप्त विद्यार्थींनी २३ जुलै रोजी सकाळी हदगाव शहराजवळील भदंत टेकडीजवळ बस अडवून आंदोलन केले. यामुळ एसटी महामंडळासह पोलिस प्रशासनाचीही काहीशी तारांबळ उडाल्याचे पाहावयास मिळाले.
इयत्ता बारावीपर्यंत शाळेत ये-जा करण्यासाठी मुलींना मोफत बसपासची व्यवस्था आहे. उन्हाळी सुटीच्या काळात बससेवा बंद असते. या वर्षी १६ जुन पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून छोट्या छोट्या थांब्यावर चालक वाहक बस थांबवत नसल्याने विद्यार्थिनींमध्ये असंतोष निर्माण होत आहे. यातून संघटीत विद्यार्थींनीनी बुधवारी सकाळी भदंत टेकडीजवळ बस अडवली. माहिती मिळताच हदगाव पोलिस स्टेशन येथील होमगार्ड निर्देशक व होमगार्ड तातडीने दाखल झाले अन् त्यांनी विद्यार्थींनींचे सहायक पोलिस निरीक्षकांशी बोलणे करून दिले.
यावेळी एका विद्यार्थीनीने परखडपणे पोलिस अधिकाऱ्याला आपले म्हणणे समजावून सांगितले. तसेच आगार व्यवस्थापकांनी या ठिकाणी येवून आम्हाला लेखी दिले तरच आम्ही आंदोलन मागे घेवून असे स्पष्ट केले. त्यांनंतर हदगावचे वाहतूक नियंत्रक यांनी विद्यार्थींनीना लेखी आश्वासन दिल्यानंतर एसटीचा मार्ग मोकळा केला. यावेळी चालक वाहकाने नम्रता दाखवून विद्यार्थिनीची समस्या समजून घेतली. आता लोकप्रतिनिधींनीही आगार व्यवस्थापकांना बस थांबविण्याबाबत सुचना देणे गरजेचे आहे.