नांदेड: दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना कोलंबी ते मांजरम या रस्त्यावरील मांजरम शिवारात सकाळी १०.३० वाजेदरम्यान घडली. शेषेराव भुजंगराव पवार-आंतरगावकर (५४) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते मांजरम (ता. नायगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त होता.
नांदेडच्या हडको परिसरातील एनडी- ४२, जे-२, वैभव नगर येथील रहिवासी सहशिक्षक शेषेराव पवार गुरुवारी सकाळी १०.३० वाजेदरम्यान कोलंबी ते मांजरम या रस्त्यावर दुचाकीने प्रवास करत होते. मांजरम शिवारात समोरून आलेल्या भरधाव दुचाकीसोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली. यात पवार गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नायगाव येथील रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तसेच या अपघातात समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. जखमी दोघेही मुखेड तालुक्यातील मंडलापूर-बोरगाव येथील रहिवासी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मयत सहशिक्षक शेषेराव पवार यांच्यावर गुरुवारी ५ वाजेदरम्यान नवीन नांदेड परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुले, सुना तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच 'लसाकम' या कर्मचारी संघटना, जि. प. च्या विविध प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आदींनी अभिवादन केले.