नांदेड - एनसीबीच्या टीमने नांदेडमध्ये अंमली पदार्थाच्या साठ्यावर छापा मारून पकडलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन झाल्यावर पुढे येणार आहे.
गेल्या 22 नोव्हेंबर रोजी एनसीबीच्या मुंबई टीमने नांदेड शहराजवळील बोंढार शिवारात छापा मारला होता. यावेळी 100 किलो पोपीस्ट्रॉ आणि दीड किलो अफीमचा साठा मिळून आला होता. या प्रकरणात एनसीबी ने 4 आरोपीना अटक केली होती. चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत नांदेडच्या कारागृहात आहेत. त्यापैकी जितेंद्रसिंग भुल्लर नावाच्या आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला.
काल सायंकाळी सोबतच्या कैद्यांनी आवाज दिल्यानंतर जितेंद्रसिंघ हालचाल करत नव्हता. कारागृह अधीक्षकांना माहिती मिळाल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. जितेंद्रसिंघ यांचे इन-कॅमेरा शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.