नांदेड : शहरातील विविध भागात एकाकी जीवन जगणाऱ्या किंवा सहारा नसलेल्या वृद्धांची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये नसल्याने या वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात तर या वृद्धांचे चांगलेच हाल झाले.
एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने आणि त्यांच्या आरोग्य व इतर प्रश्नांसाठी महापालिका प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध नागरिकांची नोंद घेणे अपेक्षित आहे. या वृद्ध नागरिकांना भेटून त्यांची विचारपूस पोलीस कर्मचाऱ्यांकडून करणे अपेक्षित आहे. याच अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या निराधारांची नोंद घेतली जाते. मात्र शहरात एकाही पोलीस ठाण्यात अशा नागरिकांच्या नोंदी नाहीत.
शहरात पाच पोलीस ठाणी
शहरात आजघडीला पाच पोलिस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अनेक वृद्ध एकटे आयुष्य जगत आहेत. परंतु त्यांची कुणाचीही पोलिसांकडे नोंद नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ज्येष्ठ नागरिकांना अडचणीच्या काळात मदतीसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांसंदर्भात नियमित बैठका घेण्यात येतात. परंतु या बैठकांना उपस्थिती दर्शविणारे वृद्ध आणि प्रत्यक्षात एकटे असलेले वृद्ध यामध्ये फरक आहे.
कोरोना संसर्ग काळात एकाकी असलेल्या या वृद्ध नागरिकांचे चांगलेच हाल झाले. या नागरिकांना औषधी आणण्यासाठीही कोणाची मदत घ्यावी, असा प्रश्न पडला होता.