कंधार, जि. नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे भले केले. मात्र, देशातील शेतकऱ्यांना ते उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. कंधार तालुक्यातील पानभोसी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची कृषी बाजारपेठ अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी खुली करा, अशी मागणी केली आहे. भारताची कृषी बाजारपेठ खुली केली नाही तर २५ टक्केऐवजी ५० टक्के शेतमालाला कर लावला जाईल. तसे केले तर इथला शेतकरी मरेल. सध्या भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या शेतमालावर १० टक्के कर लागतो. तो त्यांनी २५ टक्के द्यायचा ठरविला आहे. तरीही भारताचे कृषिक्षेत्र अमेरिकेच्या शेतकऱ्यांना खुले केले नाही, तर २५ टक्केऐवजी ५० टक्के कर शेतमालावर केल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी परिस्थिती पाहता देशाच्या शेतकऱ्यांना ते उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. शासनाचा कापसाचा हमीभाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये आहे. आपल्या देशात एकरी उत्पन्न १४ क्विंटल एकरी शेतकरी घेतो. पण, अमेरिकेतील शेतकरी ३० ते ३५ क्विंटल एकरी उत्पन्न घेतो. त्यांच प्रोडक्शन आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे इथली बाजारपेठ खुली केली आणि त्यांनी कापसाचे प्रोडक्शन आपल्या भारतात आणले, तर आपला कापसाचा भाव ३ हजार २०० ते ३ हजार ५०० पर्यंत येईल, असेही ते म्हणाले.
या सोहळ्याला माजी आ. ईश्वरराव भोसीकर, फारूक अहमद, राजेंद्र भोसीकर, शिवा नरंगले, मनोहर भोसीकर, सरपंच राजश्री भोसीकर, महेश भोसीकर आदी उपस्थित होते.