बारूळ : कंधार तालुक्यातील बारूळ परिसरातील आलेगाव या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेसंदर्भात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे सर्जेराव बळवंतराव मोरे यांनी रिट याचिका दाखल केली. या ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गाची जागा काढण्यात आलेल्या सोडतीनुसार प्रभाग क्रमांक दोनमध्ये देणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता प्रभाग दोनऐवजी सदर नागरिकांचा मागास प्रवर्गाची जागा प्रभाग क्रमांक ३ मध्ये देण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहता प्रथमदर्शनी चूक झाली असल्याने आयोगाचे म्हणणे विचारले. यामध्ये आयोगाने चूक झाली असल्यास ती दुरुस्त करण्यात येईल, असे न्यायालयास आश्वासन दिले. त्यामुळे आलेगाव वगळता ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आलेगाव ग्रामपंचायत ही नऊ सदस्यांची असून त्यामध्ये प्रत्येकी तीन सदस्यांचे तीन प्रभाग आहेत, लोकसंख्या व अधिनियमातील तरतुदीनुसार एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित महिला एक नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, एक नागरिकांचा मागास वर्गीय प्रवर्ग महिला, तीन सर्वसाधारण महिला व दोन सर्वसाधारण असे सदस्यांचे आरक्षण आहे. सन २०१५ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गची प्रत्येकी एक जागा प्रभाग क्रमांक दोन व तीनमध्ये आरक्षित होती. त्यामुळे सन २०२० करिता प्रभाग क्रमांक एक हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गकरिता आरक्षित झाला. त्यानंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गकरिता आरक्षित करावयाची दुसरी जागा ही प्रभाग २ व ३ मध्ये सोडत काढून प्रभाग क्रमांक दोनची चिठ्ठी आल्याने प्रभाग क्रमांक दोनमध्ये देणे आवश्यक होते. मात्र, नमुना व प्रसिद्ध करताना सदर जागा टंकलेखनाच्या चुकीमुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये दर्शविण्यात आली. याबाबत सर्जेराव बळवंतराव मोरे यांनी आक्षेप घेतला. मात्र, पुन्हा अंतिम नमुना प्रसिद्ध करताना टंकलेखनाच्या चुकीमुळे प्रभाग क्रमांक दोनमधील आरक्षण पूर्ववत तसेच राहिले आणि ज्या अर्थी मौजे आलेगाव, तालुका कंधार, जिल्हा नांदेड मधील आरक्षणाची तपासणी अधिनियम नियमातील तरतुदीनुसार केली असता खालील बाबी आढळून आल्या. मुंबई ग्रामपंचायत गावाचे प्रभागात विभाजन करणे आणि स्त्री अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागा राखून ठेवणे नियम १९६६ च्या नियम क्रमांक चार एकमधील तरतूद खालीलप्रमाणे आहे. नागरिकांच्या मागास वर्ग यांच्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी राखून ठेवायच्या जागा प्रभागांना राज्य निवडणूक आयुक्ताने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार चिठ्ठ्या काढून नेमून देण्यात येतील.
कोट
आलेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे सर्व टप्पे रद्द करण्याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून, नव्याने प्रभाग रचना करण्यासाठी या ग्रामपंचायतीचा समावेश आयोगाकडून माहे जानेवारी २०२१ मध्ये देण्यात येणाऱ्या आगामी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमात करण्यात येईल. -व्यंकटी मुंडे, तहसीलदार, कंधार.