किती दिवस कळसाचेच दर्शन?
कोरोनामुळे लॉकडाऊन घेण्यात आला. ही बाब जनतेच्या हिताची होती. परंतु, अनलॉक प्रक्रियेदरम्यान दारू दुकाने खुली करण्यास परवानगी दिली. मात्र, मंदिरे आजही बंद आहेत. त्यामुळे किती दिवस कळसाचेच दर्शन घेणार? - राम चंदेल, नांदेड.
सर्व काही सुरळीत सुरू असून बाजारपेठेतील गर्दी पाहून मंदिरे, शाळा, महाविद्यालये, शिकवण्यादेखील सुरू करण्याची मुभा शासनाने देणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा अन् भावनांचा विषय आहे. - देवयानी जोगदंड.
कोरोनामुळे लग्न समारंभाबरोबरच मंदिरांनाही निर्बंध घालण्यात आले. त्याचा परिणाम पूजापाठ करणाऱ्या प्रत्येकावर झाला असून, पूजाअर्चा हेच उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्यांचे अवघड झाले आहे. शासनाने मंदिरे खुली करावीत. - अजिंक्य जोशी, पुजारी.
आर्थिक गणित कोलमडले
मंदिरासमोर पूजेचे साहित्य विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. परंतु, मागील वर्षभरात मोठी आर्थिक कोंडी सुरू झाल्याने भाजीपाला विक्री करण्याचे काम सुरू केले आहे. - प्रशांत देशपांडे, व्यावसायिक.
नारळ, प्रसाद, बेलफूल, आदी साहित्याचे यात्रेनुसार आणि वारानुसार प्रत्येक मंदिरासमोर दुकान लावले जात असे. परंतु, मंदिरे, यात्रा बंद असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आजघडीला मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरली जात आहे. - अमोल गीतकार, नांदेड.