नांदेड-भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण या भाजपा सदस्यता नोंदणीसाठी सध्या मतदार संघात फिरत आहेत. मंगळवारी अचानक मुदखेड तालुक्यातील बारड येथील जिल्हा परिषदेत शाळेत त्या गेल्या. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर गराडा घातला. त्यानंतर श्रीजया चिमुकल्यांच्या घोळक्यात जावून बसल्या अन् त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
आमदार श्रीजया चव्हाण या सध्या भोकर मतदार संघात भाजपा सदस्यता नोंदणी अभियानासाठी दौरे करीत आहेत. मंगळवारी बारड या गावी त्या पोहचल्या. या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अचानक जिल्हा परिषद शाळेत गेल्या. आमदार आपल्या शाळेत आल्या म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घातला. त्यानंतर श्रीजयांची लगेच त्यांच्यासोबत जमीनीवर बसत मनमोकळ्या गप्पा मारल्या. शाळेतील विज्ञान प्रदर्शनास आमदार श्रीजया यांनी भेट दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील अनेक गंमतीजमती सांगितल्या. श्रीजयांच्या संवादाला चिमुकल्यांनीही खळखळून हसत प्रतिसाद दिला. त्यानंतर अभ्यास चांगला करा हा, मी पुन्हा येते, असे म्हणून श्रीजयांनी त्यांचा निरोप घेतला.