खरेदी करताना मोबाइल लांबविला
नांदेड- नायगाव शहरात भाजीपाला खरेदी करीत असताना एका युवकाचा मोबाइल लंपास करण्यात आला. ही घटना २५ डिसेंबर रोजी घडली. यशवंतराव रामराव कुऱ्हाडे हे भाजीपाला खरेदी करीत असताना त्यांच्या खिशातील साडेपाच हजार रुपयांचा मोबाइल काढून घेण्यात आला. या प्रकरणात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल
नांदेड - शहरातील समाज कल्याण कार्यालयासमोर पुतळा जाळो आंदोलन केल्याप्रकरणी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व शिष्यवृत्ती मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थी संघटनेने समाज कल्याण कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला.
तरुणाची विष घेऊन आत्महत्या
नांदेड- मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. तुकाराम नागनाथ असे मयताचे नाव आहे. २४ डिसेंबर रोजी त्यांनी कोणत्या तरी कारणावरून विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.