कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद आहेत. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने भीतीपोटी गावातून वाहनधारक कृषीमालही घेऊन येण्यास घाबरत आहेत; परंतु शेतीमाल अथवा भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना कोणीही अडविणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी घेऊन यायचा आहे, ते घेऊन येऊ शकतात.
दरम्यान, नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजर समितीमध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून गुरुवारी हळदीचे बीट पार पडले. खरेदीदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाने हळदीचे नुकसान
नांदेड जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये अवकाळी पाऊस झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी हळद शिजवून वाळत घातली आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने हळद झाकून ठेवणे अथवा एकत्र करून ठेवणे शक्य न झाल्याने शेकडो शेतकऱ्यांची हळद भिजून नुकसान झाले आहे. भिजलेली हळद कडक होऊन तिला कमी भाव मिळतो. त्यात शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान होते.
बियाण्यायोग्य हळद निघेना
गतवर्षी झालेल्या परतीच्या अतिपावसामुळे हदळीच्या उत्पन्नात घट झाली आहे, तर काही शेतकऱ्यांचा अजिबातच माल निघत नाही. अतिपाणी झाल्याने चिभाडीच्या जमिनीतील हळद पूर्णत: नासून गेली आहे. त्यात ज्या शेतकऱ्यांचा माल निघत आहे तोही दर्जेदार निघत नाही. त्यामुळे पुढील वर्षासाठी दुसऱ्या जिल्ह्यांतून अथवा ज्या शेतकऱ्याचा चांगला माल झाला आहे त्याच्याकडून बियाणे घेऊन ठेवावे लागत आहेत. हळदीचे बियाणे मुबलक प्रमाणात आणि दर्जेदार उपलब्ध होत नसल्याने पुढील वर्षात हळदीची लागवड घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.