फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नांदेड : बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतमात्रा देणे व रुंद वरंबा सरी पद्धतीनुसार सोयाबीन लागवड करणे, हे तंत्रज्ञान शासनमान्य कृषी विद्यापीठाने मान्यताप्राप्त केले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होते आहे. शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून चांगले उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने तालुक्यातील तुप्पा येथे शेतकऱ्यांसाठी मंगळवारी खरीप हंगाम पेरणीपूर्व जनजागृती मोहिमेचे तुप्पा गावातील शेतकरी एकनाथ कदम यांच्या शेतात आयोजन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन बोलत होते. या जनजागृती मोहिमेच्या कार्यक्रमात सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाची खताची मात्रा, दहा टक्के रासायनिक खतांची बचत करणे आणि बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीन लागवडीचे प्रात्यक्षिक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना थेट बांधावरून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने सोयाबीन लागवडीच्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन, फवारणी करणे सोपे जाते. तसेच पेरणीसोबतच एकाचवेळी बियाणे व खते देणे शक्य होते. खतेही बियाण्यापेक्षा खोल पडत असल्याने पिकास पुरेशी मिळतात व ते वाया जात नसल्याचे सांगितले.
कृषी सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी करण्याच्या गोणपाट पद्धत, पेपर रोल पद्धत व शीघ्र पद्धतीविषयी प्रात्यक्षिक रूपाने माहिती दिली.
नांदेड कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे यांनी जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खताची मात्रा कशी घ्यावी, हे समजावून सांगून, दहा टक्के रासायनिक खतांमध्ये बचत करण्याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांनी केले.
यावेळी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी कार्तिकी, तुप्पा गावच्या सरपंच मंदाकिनी यन्नावार, दत्ता कदम, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, नांदेडचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, नांदेडचे मंडल कृषी अधिकारी सतीश सावंत, आनंदराव तिडके, कृषी पर्यवेक्षक गोपाळ चामे, कृषी सहाय्यक अर्चना कास्टेवाड, चंद्रकांत भंडारे, यमुना बर्डे, वैशाली मोरलावर, उज्ज्वला मगर, शिवाजीराव कदम, शेतकरी बचत गटाचे किशोर कदम, माधव कदम, साईनाथ कदम, संजय कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या जनजागृती मोहिमेसाठी कृषिमित्र सुरेश कदम, हरी कदम, कृषी सहाय्यक अर्चना कास्टेवाड आदींनी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या हस्ते कृषी विभागातील कृषी अधिकारी, कर्मचारी व बचत गटातील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. रवी पंडित यांनी आभार मानले.