नांदेड - पाकिस्तानचे पाणी बंद केले हा सरकारचा दावा पूर्णपणे खोटा आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
भारत सरकारने 1960 इंडस पाणी करार थांबवला असे पत्र पाकिस्तानला लिहिले आहे, असे सांगताना आंबेडकर यांनी ते पत्र वाचून दाखवले. या पत्रात आम्ही पाणी थांबवले असा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. अबेयन्स असा शब्द पत्रात असून त्याचा अर्थ एकप्रकारे न्यायालयात स्टेटस्को असा होतो, त्यामुळे पाणी थांबवले, पाकिस्तानला पाण्याच्या एका एका थेंबासाठी तरसावे लागेल असे म्हणणे पूर्णपणे खोटे आहे असे आंबेडकर म्हणाले.
पुलवामा प्रमाणेच पहेलगामच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत असेही आंबेडकर म्हणाले. पहेलगाम घटनेनंतर कारवाई करण्यासाठी सैन्य तयार आहे पण राजकीय इच्छाशक्ती नाही, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी येत्या दोन तारखेला हुतात्मा स्मारकासमोर बसणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तिजोरी खाली असेल तर डोनेट करण्यासाठीही आम्ही तयार आहोत, आमचा कारवाईसाठी पाठींबा आहे हे सांगण्यासाठी हुतात्मा स्मारकासमोर बसणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.