नांदेड : जिल्ह्यात दररोज विवाहितेच्या छळाच्या अनेक घटना घडतात. यातील काही छळ मानसिक, शारीरिक प्रकारातील असतात. यामध्ये हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ होत असल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे हुंडीबंदी नावालाच उरली आहे.
दोन वर्षांत जिल्ह्यात शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक कारणावरून विवाहितेचा छळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत ९०० अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलकडे प्राप्त झाले. यानंतर चालू वर्षात जानेवारी २०२१ ते जून या कालावधीत ४५४ प्रकरणांत अर्ज दाखल झाले. यातील बहुतांश छळाच्या घटनांमध्ये पैसा, घर, शेती, गाडी या बाबींसाठी विवाहितांना त्रास देण्यात आला आहे. लग्नामध्ये कबूल केलेल्या बाबी विवाहितेच्या सासरच्या मंडळींना न मिळाल्याने हा छळ होत असल्याचे तक्रारीतून दिसत आहे.
काही वर्षांत मुला-मुलींचे लग्न अनेक बाबींमुळे होत नसल्याने हुंडा देण्याची वेळ येत आहे.
यामध्ये शिक्षण, नोकरी या गोष्टी प्रामुख्याने लग्नाच्या वेळी पाहिल्या जातात.
वधू-वर यांना अपेक्षेप्रमाणे सर्व बाबी मिळत नसल्याने पैशांची मागणी लग्नामध्ये केली जाते.
अशिक्षितापासून उच्च शिक्षितांपर्यंत...
ग्रामीण तसेच शहरी भागात विवाहितेच्या छळाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.
यामध्ये सर्वत्र पैशाचे कारण प्रामुख्याने अर्जामध्ये दाखल केलेले असते.
शारीरिक, मानसिक छळ होत असला तरी त्यासाठी सुरुवातीला पैशांची मागणी विवाहितेकडे केली जाते.
मुलींचे माता-पिताही जबाबदार
लग्न जुळविताना ज्यावेळी मुलांकडून हुंड्याची मागणी होते. त्याचवेळी मुलीच्या माता-पित्यांनी त्याला विरोध करण्याची गरज आहे, परंतु आजही समाजात हुंडा देणे आणि घेणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यातून मग पुढे वितुष्ट निर्माण होते.