हदगाव: येथील खुदबानगरमध्ये राहणाऱ्या तरुणाने एका मुलीचा पाठलाग करत त्रास देणे सुरू केले. यामुळे मुलीच्या नातेवाइकांनी त्याला वारंवार समजावून सांगितले, विनंती केली तरी तो ऐकत नव्हता. अखेर मुलीच्या नातेवाइकांनी चाकूने भोसकून त्या तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी ( दि.२१) रात्री ८:३० वाजेच्या दरम्यान घडली. अरफत महेमुद शेख (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
मृत तरुणाची आई मुबीनाबी महेमुद शेख (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी नुसार, शेख कुंटुंबाच्या शेजारीच राहणारे राम्या संभा काळे, पम्या संभा काळे, साहेबराव संभा काळे, कृष्णा काळे यांनी दोन वर्षांपूर्वी अरफत यास आमच्या मुलीच्या नादी लागू नको, तिचा पिच्छा सोड नाही तर जीवाशी जाशील अशी धमकी दिली होती. दरम्यान, शुक्रवारी ( दि.२१) सायंकाळी ६:३० वाजता अरफत हा घरासमोरील मोकळ्या जागेत लाकडावर बसला होता. यावेळी काळे कुटुंबीय अन्य नातेवाईकांना घेऊन आले. त्यांनी अरफतला लाथाबुक्या मारण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरु असतानाच अचानक संजय काळे याने अरफतच्या पोटात चाकूने वार केला. त्यामुळे अरफत खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अरफतचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने शहरात गर्दी होती. त्यात खुनाच्या घटनेमुळे शहरात अफवा पसरली. माहिती मिळताच पोलिसांनी बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली. जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी शफाकत आमना व हदगावचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी हे पथकांसह घटनास्थळी पोहोचले. मयताची आई मुबीनाबी महेमुद शेख यांच्या फिर्यादीवरून हदगाव ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम्या संभा काळे, पम्या संभा काळे, साहेबराव संभा काळे, कृष्णा काळे, संजय खानजोडे, संजय काळे यांच्यासह एकूण १० आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.