देगलूरमध्ये उमेदवारीसाठी नव्या चेहऱ्यांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:05 AM2019-07-04T01:05:26+5:302019-07-04T01:07:16+5:30

परिसिमन आयोगाकडून देगलूर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले.

Deburoor's new faces for the candidature | देगलूरमध्ये उमेदवारीसाठी नव्या चेहऱ्यांची चर्चा

देगलूरमध्ये उमेदवारीसाठी नव्या चेहऱ्यांची चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसच्या उमेदवारीकडे लक्ष इच्छुकांकडून मोर्चेबांधणीअनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

श्रीधर दीक्षित।
देगलूर : परिसिमन आयोगाकडून देगलूर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले. पुनर्रचना होण्यापूर्वी जनता दलाचे गंगाराम ठक्करवाड यांचा अपवाद वगळता देगलूर मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी २०१४ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या साबणे यांनी बाजी मारली. येणाºया विधानसभेसाठी प्रमुख पक्षाकडून नवे चेहरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघातील एकूण एक बूथवर मतदान झाले आणि पहिल्यांदाच मताधिक्य मिळाले. मिळालेले मताधिक्य भाजपचे बूथ पातळीवरचे संघटन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला मतदारांनी दिलेला प्रतिसाद होता. मात्र येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला पोषक स्थिती असल्याचा दावा करीत युतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षालाच मिळावी, अशी मागणी देगलूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपवासी झाल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक भाजपात आले. त्यापैकीच एक व मागील पंचवीस तीस वर्षांपासून देगलूर नगर परिषदेच्या माध्यमातून सक्रिय असलेले धोंडिबा कांबळे (मिस्त्री) आणि भाजपच्या मागासवर्गीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष मारोती वाडेकर हे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दोघांची उमेदवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युती होईल किंवा नाही तसेच जागा वाटपामध्ये ही जागा कोणत्या पक्षाकडे जाईल यावरच अवलंबून असेल. उमेदवारी न मिळाल्यास कांबळे व वाडेकर यांची काय भूमिका राहील हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजप-रिपाइं युतीचे भीमराव क्षीरसागर हे उमेदवार असताना भाजपच्या देगलूर व बिलोली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उघडपणे सुभाष साबणे यांना पाठिंबा दिला व साबणे विजयी झाले. मागील पाच वर्षांत आ. साबणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना सतत डावलले, अशी ओरड आहे. मागील निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून बाहेरच्या ऐवजी स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशी खंबीर भूमिका शिवसेनेचे नागनाथ वाडेकर, विवेक पडकंठवार आदी अनेक कार्यकर्त्यांनी घेत सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यापासून विरोध केला. हा विरोध अद्यापदेखील कायम आहे.
सध्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माजी आ. रावसाहेब अंतापूरकर हेच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काढलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सभेत व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत अंतापूरकर यांचा उल्लेख भावी आमदार असा केला होता. परंतु, शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या दोन अधिकाऱ्यांनी मागील वर्षभरापासून विविध प्रसंगी काँग्रेस नेत्यांच्या फोटोसह बॅनर, हस्तपत्रके काढून आपणच काँग्रेसचे उमेदवार असल्याचा प्रचार सुरु केला आहे. काँग्रेसच्या जिल्हा व तालुका पातळीवरून याबाबत कोणत्याच प्रतिक्रिया अद्यापपर्यंत तरी आल्या नाहीत. दोनच दिवसांपूर्वी एका निवृत्त अधिकाºयाने देगलूर शहरात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे संभाव्य उमेदवार असल्याची घोषणा करीत संपर्क कार्यालय थाटले आहे. देगलूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार बदलण्याचा श्रेष्ठींचा विचार आहे की अंतापूरकर विरोधकांकडून हा भ्रम निर्माण केला जात आहे, याचे उत्तर मिळत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे असल्याचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका वेगळी राहणार नसल्याचे दिसते.
लोकसभा निवडणुकीत कसलेही संघटन नसलेल्या वंचित बहुजन आघाडीने उल्लेखनीय मते घेतली आहेत. वंचित आघाडीने येथून उमेदवार द्यावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याचे प्रयत्न राज्यपातळीवर चालू आहेत. हा समावेश झाल्यास जागा वाटपामध्ये देगलूर मतदारसंघाची जागा कोणाकडे, नेमका उमेदवार कोण अशा विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ वाटच पहावी लागणार आहे.

Web Title: Deburoor's new faces for the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.