नांदेड : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज अनेकांचे मृत्यूही होत आहेत; परंतु त्यानंतरही नागरिक नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत. सर्रासपणे विनामस्क फिरत आहेत. मात्र, नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात दत्त मांजरी या गावात कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या गावातील महिला आणि पुरुष यांच्यासह चक्क जनावरांना मास्क घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. शिवाय जनावरांना बांधताना सोशल डिस्टन्सचे पालन केले जाते आणि जनावरांच्या गोठ्यात सॅनिटायझरची फवारणीदेखील केली जाते.
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या दत्त मांजरी येथील गावकऱ्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सध्या नांदेड जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शहरासह ग्रामीण भागातदेखील आता कोरोना पसरला. माहूर तालुक्यातील दत्त मांजरी हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. इथले गावकरी कमी शिकलेले आहेत; पण गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच गावकरी विशेष खबरदारी घेत आहेत. सरकारी नियमांचे पालन इथे काटेकोरपणे केले जात आहे. अशातच जनावरांना देखील आजार होत असल्याचे गावकऱ्यांना जाणवले, तेव्हा जनावरांना कोरोना होईल या भीतीने गावकऱ्यांनी जनावरांना मास्क घालण्याचा निर्णय घेतला. शेळ्यांना इथे मास्क घातला जातो. गोठ्यात बांधताना शेळ्यांना देखील अंतर ठेवून बांधले जाते आणि गोठ्यात सॅनिटायझरची फवारणी देखील केली जाते. शेळ्या चरायला नेताना गाव संपेपर्यंत मास्क काढला जात नाही. गावाबाहेर जंगलात मास्क काढला जातो आणि परत गावात येताना शेळ्यांना मास्क घातला जातो. या गावाची लोकसंख्या पंधराशे आहे. आतापर्यंत गावात दहाजणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये कोरोनाबाबत भीती पसरली आहे. याच भीतीतून गावकऱ्यांनी जनावरांना देखील मास्क घालण्याचा निर्णय घेतला आहे.