नांदेड - बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांना पकडण्यासाठी शुक्रवारी नांदेड ग्रामीण ठाणेदारांसह पोलिसांनी येथे गोदावरी नदीत उड्या मारल्या. केवळ दोघे हाती लागले असून, इतर वाळू तस्कर पळून गेले. वाळूसाठ्यासह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तराफे जाळून नष्ट केले गेले. या कारवाईत आठजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाला विष्णुपुरी भागात गोदावरी नदी पात्रातून काही वाळू माफिया बेकायदेशीर वाळू उपसा करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ग्रामीण ठाण्याच्या पथकाने दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी छापा मारला असता पोलिसांना पाहून पाच ते सहा आरोपी नदीपात्रात उडी मारून दुसऱ्या तीरावरून पळून गेले. दोघे नदीपात्रातून पोहत जात असताना पोलिस अधिकारी व अंमलदारांनी चक्क नदीपात्रातील पाण्यात उड्या मारून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाईत १ लाख २५ हजारांचा वाळूसाठा, १२ लाखांचे सहा इंजिन, ८ लाख ५० हजारांचे १७ तराफे असा एकूण २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पांडुरंग महादराव हंबर्डे (२५, रा. काळेश्वर विष्णुपुरी), अच्छेलाल गुलाबचंद राम (३२, रा. लक्ष्मणपुरा उत्तर प्रदेश) व इतर आठ आरोपींविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविला. तसेच काही तराफे पोलिसांनी जाळून नष्ट केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलिस उपनिरीक्षक बाबूराव चव्हाण, सपोउपनि शेटे, पोहेकॉ प्रमोद कऱ्हाळे, तेलंग, डफडे, पोकॉ सिरमलवार, कदम, भिसे, पटेल, कवठेकर, मेकलवाड, इम्रान, शेख रियाज, आदींच्या पथकाने केली.
वाळू माफियांचा सर्वत्रच उच्छादजिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शहर व परिसरात वाळू माफिया चांगलेच सक्रिय झाले असून, रात्री-बेरात्री हायवा ट्रकमधून गोदावरी नदीपात्रातून विना परवाना बेसुमार वाळू उपसा करीत आहे. नांदेड शहरालगत असलेल्या गोदावरी नदीपात्रातून दररोज विना परवाना लाखो रुपयांची वाळू उपसा केली जाते. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे सुरू असल्याने वाळूला अधिक मागणी आहे.