मराठवाड्यातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा असलेल्या नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १६ तालुके असून या जिल्ह्याच्या सीमा परप्रांताला जोडणाऱ्या आहेत. त्यामुळे नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे महत्त्व अधिक आहे. राज्यासह इतर राज्यांत जाणाऱ्या बसगाड्यांची संख्याही मोठी आहे. प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या नांदेड बसस्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. नांदेड शहराचा विकास होत असताना बसस्थानकाच्या विकासाचा विसर पडला आणि अनेक वर्षांपासून बसस्थानकात कोणतेही विकास काम झाले नाही. शिवाजीनगर ते कलामंदिर या ओव्हरब्रीजमुळे बसस्थानक पूर्णपणे आडबाजूला पडले आहे. ब्रीजहून जाताना बसस्थानकाचे दर्शन होते. मात्र, कलामंदिर व डाॅक्टरलेन येथून जवळच असलेले बसस्थानक नजरेसमोर येत नाही. त्यामुळे नवीन प्रवाशांना बसस्थानक कुठे आहे, असा प्रश्न पडतो. या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक दुमजली इमारतीत आहे. मात्र, बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. बसस्थानकातील अस्वच्छतेमुळे प्रवाशांना नाकाला रूमाल बांधवा लागतो. धुळीमुळेही प्रवासी वैतागले आहे. बसस्थानकात प्रवेश करतानाच अनेक खड्डे समोर दिसतात. पावसाळ्यात या खड्ड्यातील घाण पाणी साचून ते प्रवाशांच्या अंगावर उडते.
बसस्थानकात आल्यानंतर नवीन प्रवाशांना कोणती बसगाडी कुठे लागली, याचा थांगपत्ता लागत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना बस कुठे लागली याचा शोध घ्यावा लागतो. त्यानंतर लघुशंकेसाठी गैरसोय सहन करावी लागते. महिलांची या बाबतीत कुचंबणा होते.
- हरिभाऊ मस्के, प्रवासी
बसस्थानकात आसनव्यवस्था व्यवस्थित नसल्याने धुळीने माखलेल्या आहेत. त्या ठिकाणी बसावे लागते. या ठिकाणी अनेक लोक पाने खावून थुंकतात, घाण करतात. याचा इतर प्रवाशांना त्रास सहन करवा लागतो. महिलांसाठी सोयीचे स्वच्छतागृह हवे असून रात्रीच्या वेळेस ते सुरक्षित असावे.
- सीमा पवार, महिला प्रवासी
बसस्थानकात गाड्या थांबण्याच्या ठिकाणी फलाट क्रमांक आणि प्रत्येक गावाची नावे स्पष्ट आणि ठळक अक्षरात नसल्याने प्रवाशांना ते गैरसोयीचे ठरत आहे.
प्रवाशांना गाडी कुठे येणार, त्यासाठी कुठे थांबायचे, हे समजत नाही. महिला प्रवाशांची धावपळ होते.
बसस्थानकातून वेळेत बसगाड्या बाहेर पडत नसल्याने अनेकदा बसगाड्या अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे बसस्थानकात गर्दी दिसून येते.
बसस्थानकात वेळापत्रक दर्शनी भागात लावणे गरजेचे असून त्यामुळे प्रवाशांना सोयीचे ठरेल.