नांदेड : जिल्ह्यात आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, प्रमुख रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शहरभर पाणीच पाणीपहाटे 2 वाजल्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. वजीराबाद, भाग्यनगर, मोंढा, महावीर चौक, आनंद नगर, आणि शिवाजी नगर यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीपासून खबरदारीचा उपाय म्हणून शहराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातही पूरसदृश परिस्थितीशहराप्रमाणेच ग्रामीण भागातही पावसाने कहर केला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि बचावकार्यासाठी प्रशासनाने तातडीने सैन्य दलाला पाचारण केले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि मदत व बचाव पथके नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत आहेत.
पुढील 24 तासांसाठी 'येलो अलर्ट'हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. यामुळे आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी मदत व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.