ढगाळ वातावरणाने उकाड्यात वाढ
मुखेड - मुखेड तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसापासून ढगाळ वातावरण असूनल उकाडा वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. सकाळी व संध्याकाळी मशागतीची कामे शेतकरी करीत असतात. उकाड्यामुळे वृद्ध, लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हाबंदी उरली नावालाच
लोहा - लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. लोहा शहरात येणारी वाहने थेट प्रवेश करीत आहेत. शहर व जिल्ह्याच्या हद्दीत सीमाबंदीचे आदेश नावालाच आहेत. वाहन प्रवेश करताना कोणत्याही वाहनाची तपासणी केली जात नाही. वाहनांची कडक तपासणी करण्याची मागणी होत आहे.
जड वाहनांची वाढती वर्दळ
नांदेड - शहरातील मुख्य रस्त्यावरून जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. याचा त्रास नागरिक व वाहन चालकांना होत आहे. शहरातील रस्त्यावर खड्डे पडल्याने खराब झाले असून, यातच जड वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यवरील खड्डे दुरुस्तीची मागणी होत आहे.
घरकुलांची बांधकामे अर्धवट
हिमायतनगर - रमाई आवास योजना तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानाचा हप्ता वेळेवर मिळत नसल्याने बांधकाम बंद ठेवावे लागत आहे. यामुळे अनेक घरांची बांधकामे रखडली आहेत. वाळूची समस्याही निर्माण झाली आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्लास्टिकबंदीचा बोजवारा
बिलोली - शहरातील किरकोळ विक्रेत्यांसह लघु विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात आहे. नगरपालिकेचे पथक याप्रकरणी कारवाई करीत नसल्याने हा प्रकार वाढला आहे. राज्यात प्लास्टिकबंदी असताना बिलोलीत मात्र प्लास्टिकच्या कॅरिबॅग वापरल्या जात आहेत.
रेल्वे प्रवाशांची गैरसोय
नांदेड - दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काही विशेष रेल्वे बंद केल्या आहेत. प्रवासी संख्या कमी झाल्याचे कारण देत या रेल्वे बंद करण्यात आल्या. यातच सध्या खासगी प्रवासी वाहतूक व एसटी महामंडळाची बससेवाही बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
भूजल पातळीत घट
नांदेड - जिल्ह्यात यावर्षी उशिराने भूजल पातळीत घट झाली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून पाणीपातळी घटल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातही परिस्थिती गंभीर आहे. अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना बंद झाल्या. ग्रामस्थांना शेतशिवारातून पाणी आणावे लागत आहे.
स्वच्छतागृहाअभावी गैरसोय
नांदेड - शहरातील विविध भागातील स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली. त्यामुळे व्यापारी व नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात अनेक व्यापारी प्रतिष्ठान आहेत. मात्र मनपाने स्वच्छतागृह बांधलेली नसल्याने त्याची मागणी होत आहे.
एटीएममध्ये घाणीचे साम्राज्य
नांदेड - शहरातील तिरंगा चौकामध्ये असलेल्या एटीएममध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एटीएमच्या शेजारीच अनेक जणांनी पिचकाऱ्या मारल्याने हा भाग लाल रंगमय झाला. कचराही अधूनमधून एटीएममध्ये असतो. बँक ऑफ इंडियाच्या संबंधितांनी याकडे लक्ष देऊन साफसफाई करण्याची मागणी होत आहे.
हातपंप आटल्याने गैरसोय
नांदेड - शहरातील विविध भागातील हातपंपातील पाणीपातळी खोल गेल्याने पाणी आटले आहे. यामुळे या भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. काही ठिकाणी नळ योजना नसल्याने केवळ हातपंपावर नागरिकांची मदार होती. मात्र हातपंपाचेही पाणी आटल्याने लाेकांना आता गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
आदेशाचे उल्लंघन
उमरी - जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र उमरी परिसर त्याला अपवाद ठरत आहे. या भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. मधल्या काळात कारवाईची मोहिमही हाती घेण्यात आली. ती आता थंडबस्त्यात आहे.
खत, बियाणे महागले
धर्माबाद - तालुक्यातील शेतकरी वर्ग खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून, काही दिवसातच पावसाळा सुरू होत असल्याने शेतकरी खते व बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहे. मात्र खत आणि बियाण्यांचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
चालकाची आत्महत्या
उमरी - कुदळा ता. उमरी येथील चालक राजेंद्र गंगाधर बिरजे (२०) याने विष्णूपुरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळले नाही. ग्रामीण पोलीस ठाण्यात गंगाधर बिरजे यांनी फिर्याद दिली. हवालदार रामगीरवार तपास करीत आहेत.
वीजपुरवठा सुरळीत
हदगाव - बरडशेवाळा वीज उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील कवाना तांडा येथे दोन डीपी नादुरुस्त झाल्याने १५ दिवस ते अंधारात होते. उपसरपंच संदीप पवार, माजी सरपंच नंदू असोले, साहेबराव पाटोदे, रवी भाते यांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. जवळगावकर यांनी महावितरण कंपनीकडे संपर्क केला. कंपनीने डीपीसह इतर सुविधा उपलब्ध करून दिली.
बुद्धविहाराचे उद्घाटन
किनवट - वझरा बु. येथे बुद्धविहाराचे उद्घाटन व तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण सरपंच अनुसयाबाई कनाके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य रेणुका कांबळे, जि.प. सदस्य सुनयना जाधव यांच्या फंडातून सभामंडप व लोकवर्गणीतून बुद्धविहार उभारण्यात आले. सपोनि मल्हार शिवरकर, माजी जि.प. सदस्य बंडूसिंग नाईक यांनी बुद्धविहाराचे उद्घाटन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
माकणी येथे उपक्रम
मुखेड - तालुक्यातील माकणी येथे गाळयुक्त शिवार गाळमुक्त तलाव उपक्रमाला तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी बालाजी ढोसणे, सरपंच प्रवीणकुमार गवाने, रामदास वाघमारे, पंढरी कांबळे, उपसरपंच माधव टेंभुर्णे, सुरेश टेंभुर्णे, गजानन गव्हाणे, अनिल गव्हाणे उपस्थित होते.