लोहा (जि. नांदेड): लोहा तालुक्यातील पेनुर गावात अनैतिक प्रेमसंबंधातून उफाळलेल्या वैरातून एकाला जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना रविवारी ( दि. ८ ) उघडकीस आली आहे. श्रीरंग अमलगोंडे असे मृताचे नाव असून तब्बल सहा महिन्यांनी गावी परताच त्याला जीव गमवावा लागला. या प्रकरणात सोनखेड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी भागवत अमलगोंडे याची पत्नी आणि मयत श्रीरंग अमलगोंडे गावातून एकत्र पळून गेले होते. त्यानंतर काही काळाने पुन्हा आठ जून रोजी श्रीरंग गावात परत आला. मात्र, जुन्या वादाची ठिणगी पुन्हा पेटली. अनैतिक संबंधांच्या रागातून तिघांनी मिळून श्रीरंगवर लाकूड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर गावकऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत श्रीरंगला रुग्णालयात नेत असतानाच शेवडी परिसरात त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक पांडुरंग माने यांनी कारवाई करत अंगद अमलगोंडे, भागवत अमलगोंडे आणि लक्ष्मण अमलगोंडे या तिघा आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.