All should come together on the issue of drought | दुष्काळाच्या समस्येवर सर्वांनी एकत्र यावे
दुष्काळाच्या समस्येवर सर्वांनी एकत्र यावे

ठळक मुद्देपालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड : मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री कदम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. पालकमंत्री कदम म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे आपल्या सर्वांना जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले, हे विसरुन चालणार नाही. महामानवाचे समाजावर अनंत उपकार आहेत, अशी आठवण करुन देत ज्यांनी-ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या या आठवणीबरोबर त्यांना दु:ख होईल असे काम आपल्या हातून होणार नाही, याची दक्षता प्रत्येकांनी घेतली पाहिजे. आपण एकमेकांपासून विखुरले जाऊ नये, त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत होते पोटाला जातीचे कव्हर लावू नका, जे पोट रिकामे आहे ते कुठल्याही जाती, धर्माचे असो ते पोट भरले पाहिजे. तीच भावना सरकारची आहे. आम्ही सर्वजण एक आहोत हे राष्ट्रीय सणातील घोषणेपुरते मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने आपण एका कुटुंबातील, एका रक्ताचे, भारतीय आहोत, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणं गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कदम यांच्या हस्ते जानापुरी येथील शहीद जवानांच्या वीरपत्नी श्रीमती शीतल संभाजी कदम यांना लोहा तालुक्यातील खरबी येथील २ हेक्टर जमिनीचा जिल्हाधिकारी यांचा आदेश सन्मानपूर्वक देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शीलाताई भवरे, आ़ अमर राजूरकर, आ़ डी. पी. सावंत, आ़ अमिताताई चव्हाण, आ़ हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी उपस्थित होते.
केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, राज्य राखीव पोलीस बल हिंगोली, सशस्त्र पोलीस पथक (क्यूआरटी), सशस्त्र पोलीस पथक (पोलीस मुख्यालय), पुरुष गृहरक्षक दल पथक, शहर वाहतूक शाखा पथक, महिला गृहरक्षक दल पथक, अग्निशमन दल, एनसीसी मुलांचे पथक (सायन्स महाविद्यालय) , महात्मा फुले हायस्कूल स्काऊट मुले पथक, चक्रवर्ती अशोक विद्यालय पळसा पथक, श्री दत्त हायस्कूल तळणी पथक, पोलीस बँड पथक, श्वानपथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, मार्क्स मॅन क्यूआरटी, वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, १०८ रुग्णवाहिका यांनी संचलन केले.


Web Title: All should come together on the issue of drought
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.