नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. येथील जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यापूर्वी कोरोनाची ॲटिजेन तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शुक्रवारपासून या तपासणीला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेत दररोज मोठ्या प्रमाणात कामानिमित्त जिल्हाभरातून नागरिक येतात. हे नागरिक वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरतात. त्यातच काही दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी काही सदस्य आणि कर्मचारी बाधित आढळले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत जवळपास दोनशे जणांची तपासणी करण्यात आली, त्यात दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेप्रमाणेच अन्य शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्यांची तपासणी करण्याची गरज आहे.
कोरोना तपासणीनंतरच जिल्हा परिषदेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:32 IST