नांदेड : परभणी येथे संविधान शिल्पाची नासधूस करणाऱ्या माथेफिरु आता संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला आहे.
या माथेफिरुने संविधान शिल्पाची नासधूस केल्याने परभणीत दोन दिवस हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणातील आरोपीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पाच ते सात भीमसैनिक रुग्णालयातील आयसीयू कक्षात शिरले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमाही आणली होती. आरोपीने बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत माफी मागितली.
परभणी प्रकरणातील आरोपीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आरोपीवर उपचार चालू असल्याने त्याच्या बंदोबस्तासाठी परभणीच्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यात गुरुवारी रात्री पावणेदहा वाजता पाच ते सातजण अचानक आयसीयूमध्ये आले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या दोन पोलिस आणि सुरक्षारक्षकांसोबतही त्यांचा वाद झाला. यावेळी भीमसैनिकांनी बाबासाहेबांची प्रतिमा सोबत आणली होती. आरोपीने प्रतिमेसमोर कान पकडून नतमस्तक होत माफी मागितली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात शुक्रवारी रात्री अज्ञात पाच ते सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.